भावाचा अपघात झाला म्हणून सांगितले अन् निर्जनस्थळी नेऊन केला बलात्कार

भावाचा अपघात झाला आहे, असे सांगून मोटारसायकलवरून डोंगरात निर्जनस्थळी नेऊन पाच जणांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape in Daund) केल्याची घटना दौंड तालुक्यातील खोर येथे घडली.

    पाटस : भावाचा अपघात झाला आहे, असे सांगून मोटारसायकलवरून डोंगरात निर्जनस्थळी नेऊन पाच जणांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape in Daund) केल्याची घटना दौंड तालुक्यातील खोर येथे घडली. याप्रकरणी यवत पोलिसांनी बारा तासांच्या आत या नराधमांना अटक केली. ही माहिती यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.

    याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिला ही तिच्या पतीसोबत जेवण करण्यासाठी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या भांडगाव येथील हाॅटेल यशोदा येथे आले होते. पती हा हॉटेलमध्ये जेवण सुरू आहे का हे पाहण्यासाठी गेला होता. तेवढ्या वेळात एक व्यक्ती मोटारसायकलवरून आला आणि तुमच्या भावाचा अपघात झाला आहे, असे सांगितले. त्या पीडित महिलेला मोटारसायकलवर घेऊन खोर गावच्या हद्दीत डोंगरात निर्जनस्थळी नेले. त्याठिकाणी अगोदरच चार नराधम होते. या पाच जणांनी या महिलेला जीवे मारण्याची धमकी देत पाशवी बलात्कार केला. शनिवारी (दि.२९) सायंकाळी सात वाजण्याच्या पुढे ही घटना घडली.

    या नराधमांनी या पीडित महिलेवर अत्याचार करून पुन्हा जेथून नेले. त्याठिकाणी आणून सोडले. घडलेला प्रकार तिने पतीला सांगितल्याने त्यांनी यवत पोलीस ठाण्यात धाव घेतली.

    पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हा दाखल केला आणि आरोपींच्या शोधासाठी पथक तैनात केले. या पथकाने बारा तासांच्या आत या नराधमांना जेरबंद केले.

    पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, उपविभागीय अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी तावरे, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.