पुण्यात कचरा वाहतुकही होणार ‘ई-वाहना’तून ! ; प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू

महापालिकेकडे कचरा उचलण्यासाठी मोठे ट्रक आहेत. या विभागासाठी ई - ट्रक वापरता येतील? याची चाचपणी सुरू आहे. या ट्रकची कचरा वहन क्षमता, वजन क्षमता तपासण्यात येत असून प्रायोगिक तत्वावर चार ट्रकचा वापर करण्यात येत आहे. यासोबतच महापालिकेने खाजगी संस्थेसोबत ई- बाईक्स भाडेतत्वावर देण्याच्या प्रस्तावाला यापुर्वीच मान्यता दिली असून महापालिका शहरात विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारुन देणार आहे.

    पुणे : वाढते प्रदुषण रोखण्यासाठी ई – वाहनांचा प्रयत्नपुर्वक वापर करण्यासाठी महापालिका पुढे सरसावली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विजेवर चालणार्‍या मोठ्या वाहनांतुन कचरा वाहतूक करता येईल का ? याची चाचपणी महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे.

    पीएमपीएमएलच्या ताफ्यात यापुर्वीच ई – बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेसमुळे प्रदुषण कमी करण्यास हातभार लागला असताना इंधनावरील खर्चातही कपात झाली आहे. येत्या काही दिवसांत आणखी ५० ई – बसेस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होत आहेत. अशातच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी २०२१-२२ या वर्षिच्या अंदाजपत्रकामध्ये अधिकार्‍यांसाठी ई- मोटारी खरेदीसाठी आर्थिक तरतूद केली आहे. त्यानुसार येत्या काही महिन्यांत या मोटारी खरेदी करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

    यासोबतच महापालिकेकडे कचरा उचलण्यासाठी मोठे ट्रक आहेत. या विभागासाठी ई – ट्रक वापरता येतील? याची चाचपणी सुरू आहे. या ट्रकची कचरा वहन क्षमता, वजन क्षमता तपासण्यात येत असून प्रायोगिक तत्वावर चार ट्रकचा वापर करण्यात येत आहे. यासोबतच महापालिकेने खाजगी संस्थेसोबत ई- बाईक्स भाडेतत्वावर देण्याच्या प्रस्तावाला यापुर्वीच मान्यता दिली असून महापालिका शहरात विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारुन देणार आहे.

    महापालिकेचा दरवर्षी इंधनावर २४ कोटी रुपये खर्च होतो. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे या खर्चामध्ये वाढच होत आहे. महापालिकेकडे आजमितीला १८० मोटार असून ७५० हून अधिक अवजड वाहने आहेत. यामध्ये प्रामुख्याने कचरा वाहतुकीसाठी सर्वाधीक वाहनांचा वापर होतो. यावर्षी अधिकार्‍यांच्या वापरासाठी ५० टक्के मोटार खरेदी करण्यात येतील. तर उर्वरीत ५० टक्के मोटार पुढील वर्षी खरेदी करण्यात येतील. ई मोटार पुरविणार्‍या कंपन्यांसोबत चर्चा सुरू आहे. विशेष असे की या मोटारींना जीपीएस सिस्टिम असल्याने मोटारींचा नियोजीत वापर होईल.

    - विक्रम कुमार, पुणे महापालिका आयुक्त