राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून गॅस शवदाहिनी मंजूर : सचिन बोगावत

    भिगवण : भिगवणची वाढती लोकसंख्या, वाढते नागरीकरण व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन विभागाच्या कोविड १९ उपाययोजनांच्या राखीव निधी अंतर्गत १ कोटी १० लाख रुपये किंमतीची गॅस शवदाहिनी मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा कोषाध्यक्ष सचिन बोगावत यांनी दिली. यासाठी ग्रामपंचायत सदस्या निलीमा बोगावत यांनी पाठपुरावा केला होता.

    कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना नाहक त्रास होत होता. पावसाळ्यात मृत्यू झाल्यानंतर अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाच्या कोविड १९ राखीव निधीतून गॅस शवदाहिनी मंजूर करण्यात आली. येथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे स्टेशन यामध्ये होणाऱ्या अपघातात अनेकांचा मृत्यू होतो. अंत्यविधी करण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे गैरसोय होत होती.

    ग्रामपंचायत सदस्या निलीमा सचिन बोगावत यांनी अशा प्रकारची गॅस शवदाहिनी मिळावी यासाठी पाठपुरावा केला होता. याला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रिमंडळाची मान्यता व सर्व बाबींची पूर्तता करून कसलाही विलंब गॅस शवदाहिनी मंजूर करून दिली. त्याबद्दल भिगवण व पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आभार मानण्यात येते आहे. यामुळे भिगवणकरांची खूप मोठी समस्या दूर होणार आहे.