गावातील मुलांच्या छेडछाडीला कंटाळून नववीतील मुलीची आत्महत्या

इंदापूर तालुक्यातील बोरी येथील नववीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide in Indapur) केली. या मुलीने गावातील तीन मुलांच्या छेडछाडीमुळे कंटाळून आत्महत्या केल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला. 

    इंदापूर : इंदापूर तालुक्यातील बोरी येथील नववीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide in Indapur) केली. या मुलीने गावातील तीन मुलांच्या छेडछाडीमुळे कंटाळून आत्महत्या केल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला.

    सिद्धी गजानन भिटे असे या अल्पवयीन मुलीचे नाव असून, ती बोरी येथील बोरी हायस्कूलमध्ये नववीत शिकत होती. तिच्या आकस्मिक मृत्यूमुळे बोरी गावाला धक्का बसला. तिने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिल्याचे दिसत आहे. पोलिसांनी याची गंभीर दखल घेत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा तीन मुलांवर दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    बुधवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास तिने घरात गळफास घेतल्याचा प्रकार उघड झाला. यानंतर गावातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तातडीने भवानीनगर पोलिसांना याची माहिती दिली आणि भवानीनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकरणी मुलीचे वडील गजानन भिटे यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली.