दुचाकी चोरणाऱ्या मामा-भाच्याच्या जोडीला ठोकल्या बेड्या; १ लाख ८० हजारांच्या दुचाकी हस्तगत

मोटार सायकल चोरी करण्यात सराईत असणाऱ्या मामा- भाच्याच्या जोडीसह चोरीच्या सहा मोटारसायकल हस्तगत करून बारामती ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

बारामती: मोटार सायकल चोरी करण्यात सराईत असणाऱ्या मामा- भाच्याच्या जोडीसह चोरीच्या सहा मोटारसायकल हस्तगत करून बारामती ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून बारामती शहर व एमआयडीसी परिसरातून दुचाकी चोरीला जाण्याच्या प्रमाण वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर बारामती ग्रामीण गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोपनीय माहीतीच्या आधारे संशयित मामा-भाचे संदीप बाळू माने (वय ३५),( रा. खंडोबा नगर,बारामती ) स्वप्नील काळूराम भोसले वय २७),(रा. निरावागज, ता. बारामती) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून बारामती तालुका पोलिस स्टेशन व बारामती शहर पोलिस स्टेशन हद्दीतून मागील दोन वर्षापासून चोरी केलेल्या २ स्टार सिटी,१ पॅशन,२स्पेंडर,१ सुझुकी आशा एकूण १ लाख ८० हजार रुपये किमतीच्या एकुण ६ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. यातील आरोपी संदीप माने हा मोटार सायकल चोरी करणारा सराईत असून यापूर्वी त्याच्यावर हडपसर पोलीस स्टेशन, बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनखाली गुन्हेशोध पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस कॉनस्टेबल नंदू जाधव, मंगेश कांबळे,विनोद लोखंडे,विजय वाघमोडे, राहुल पांढरे,रणजीत मुळीक यांनी केली.