कोरोनामुळे पतीचे निधन झालेल्या महिलांना ‘विमेन्स हेल्पलाईन’कडून मदतीचा हात

कोरोना संसर्गात घरातील कमवत्या व्यक्तीचे निधन झाल्यामुळे अनेक कुटुंबांपुढे उदरनिर्वाहाचा तसेच मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा गरजू महिलांना शासनाच्या अथवा महापालिकेच्या योजनांमधून किंवा दानशूर संस्था, व्यक्ती यांच्याकडून अर्थसहाय्य मिळवून देणे, नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत

    पिंपरी: कोरोना संसर्गामुळे पतीचे निधन झाल्याने संपूर्ण कुटुंबाच्या पालन-पोषणाची जबाबदारी येऊन पडलेल्या महिलांना मदतीचा हात देण्याचा निर्णय ‘विमेन्स हेल्पलाईन फाऊंडेशनने’ घेतला आहे.

    विमेम्स हेल्पलाईन फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा नीता परदेशी यांनी ही माहिती दिली. कोरोना संसर्गामुळे घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे अनेक कुटुंबांवर मोठे संकट ओढावले आहे. अशा परिस्थितीत फाऊंडेशनच्या वतीने गरजू महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी मोफत मार्गदर्शन व सक्रिय मदत करणार आहे. त्यासाठी गरजू महिलांनी विमेन्स हेल्पलाईनशी ९७३०५०२६६२ किंवा९८२२००१९५० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

    कोरोना संसर्गात घरातील कमवत्या व्यक्तीचे निधन झाल्यामुळे अनेक कुटुंबांपुढे उदरनिर्वाहाचा तसेच मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा गरजू महिलांना शासनाच्या अथवा महापालिकेच्या योजनांमधून किंवा दानशूर संस्था, व्यक्ती यांच्याकडून अर्थसहाय्य मिळवून देणे, नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करणे, स्वयंरोजगारासाठी मोफत व्यवसाय प्रशिक्षण देणे, व्यवसायासाठी बीजभांडवल उभे करण्याबाबत मार्गदर्शन करणे, पितृछत्र हरपलेल्या मुलांच्या पुढील शिक्षणासाठी मदत करणे, असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असे परदेशी यांनी सांगितले.