‘या संदर्भात मी जास्त बोलणं उचित ठरणार नाही’, अनिल देशमुखांच्या घरी ‘ईडी’च्या छापेमारीवर गृहमंत्री वळसेंनी दिली प्रतिक्रिया

ईडीचे पथक मुंबईहून नागपुरात दाखल झालं होतं. शुक्रवारी सकाळी स्थानिक ईडी अधिकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील पथकाने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील घरी व निकटवर्तीयांकडे धाड टाकली.

    पुणे: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरमधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) आज सकाळी छापा टाकला.याबरोबरच देशमुख यांच्या निकटवर्तीयांकडे देखील ईडीने छापे टाकल्याचे समोर आले आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले “या संदर्भात मी काही बोलण्याची गरज आहे, असं वाटत नाही. यंत्रणेचा तपास सुरू आहे आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट पण आहे. त्यामुळे या संदर्भात मी जास्त बोलणं उचित ठरणार नाही. ” तसेच मागील एक-दोन दिवसांत घडलेल्या सर्वच घडामोडी अतिशय विचित्र असल्याचेही ते म्हणाले आहेत.

    गुरूवारी रात्रीच ईडीचे पथक मुंबईहून नागपुरात दाखल झालं होतं. शुक्रवारी सकाळी स्थानिक ईडी अधिकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील पथकाने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील घरी व निकटवर्तीयांकडे धाड टाकली. १६ जूनला ईडीच्या तीन पथकांनी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित दोन सीए व एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरीही छापे टाकले होते. ईडी देशमुख यांच्याकडेही झाडाझडती घेण्याची शक्यता या छाप्यांमुळे बळावली होती.