बारामती परिमंडलात आता ‘माझे रोहित्र, माझी जबाबदारी’ ; १२ रोहित्रांवर उपक्रम; रोहित्र जळण्याची चिंता नाही

‘माझे रोहित्र, माझी जबाबदारी’ या उपक्रमाची भर पडली आहे. मांडवगण फराटा शाखेचे सहाय्यक अभियंता मतीन मुलाणी यांच्या कार्यक्षेत्रात हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबविला जात आहे. शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहता लवकरच हा उपक्रम संपूर्ण परिमंडलात राबविण्याचा मनोदय मुख्य अभियंता पावडे यांनी व्यक्त केला आहे.

  बारामती: रोहित्र जळाल्यावर त्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करणारे सर्वत्र सापडतील. पण रोहित्र जळूच नये म्हणून प्रयत्न करणारे शेतकरी शोधण्यासाठी मात्र आपणास शिरुर तालुक्यात मांडवगण फराट्यालाच जावे लागेल. येथील महावितरणच्या एका शाखा अभियंत्याने पुढाकार घेत शेतकऱ्यांना रोहित्राप्रती जागरुक करत ‘माझे रोहित्र, माझी जबाबदारी’ हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमात भाग घेणारे शेतकरी मंजूर भारानुसार पंप वापरतात. गरज पडल्यास तो अधिकृतपणे वाढवून घेतात. वीजबिल भरुन व वीजचोरी टाळून आपली जबाबदारी पार पाडत कपॅसिटरला प्राधान्य देतात. परिणामी रोहित्र जळण्याच्या कटकटीपासून त्यांची सूटका झाली आहे. मांडवगण भागातील १२ रोहित्रांवर हा उपक्रम प्रायोगिकपणे सुरु असून, लवकरच त्याची व्याप्ती वाढणार आहे.

  बारामती परिमंडलात महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या संकल्पनेतून ‘एक गाव, एक दिवस’, ‘एक दिवस, एक उपकेंद्र’ असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राज्याला मिळाले आहेत. या उपक्रमांची अंमलबजावणी सबंध राज्यात यशस्वीपणे केली जात आहे. यात अजून पुढे जात ‘माझे रोहित्र, माझी जबाबदारी’ या उपक्रमाची भर पडली आहे. मांडवगण फराटा शाखेचे सहाय्यक अभियंता मतीन मुलाणी यांच्या कार्यक्षेत्रात हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबविला जात आहे. शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहता लवकरच हा उपक्रम संपूर्ण परिमंडलात राबविण्याचा मनोदय मुख्य अभियंता पावडे यांनी व्यक्त केला आहे.

  उपक्रमाचे स्वरुप: रोहित्र नादुरुस्त होण्याची कारणे शोधली असता; वीजचोरी, मंजूरभारानुसार वापर नसणे, कपॅसिटर नसणे ही प्रमुख कारणे सापडली. तर वारंवार समस्या येत असल्याने वीजबिल भरण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचेही ध्यानात आले. म्हणून उपक्रमासाठी वारंवार जळणाऱ्या रोहित्राची निवड केली. सर्व शेतकऱ्यांचे त्या रोहित्रावर ऑनलाईन मॅपिंग करण्यात आले. शेतकऱ्यांच्या वीजपेटीवर नाव, ग्राहक क्रमांक व मंजूर भार ठळकपणे लिहिण्यात आला. ज्यांचा भार कमी होता तो अधिकृतपणे वाढवून दिला. वीजचोरी करणाऱ्यांना नवीन कनेक्शन घेण्यास भाग पाडले. रोहित्रावरील एका शेतकऱ्यांची ‘रोहित्रप्रमुख’ म्हणून निवड केली. त्याचे नाव रोहित्राच्या वितरण पेटीवर टाकण्यात आले. सर्वांना ‘कृषी योजनेचा’ लाभ घेत वीजबिल भरण्यासाठी प्रवृत करण्यात आले.

  रोहित्र प्रमुखाची जबाबदारी: रोहित्रावर कोणी वीजचोरी करीत असेल तर त्याची माहिती देणे. नवीन कनेक्शन घेण्यास भाग पाडणे. कपॅसिटरचा वापर बंधनकारक करणे. त्यासाठी ‘माझे रोहित्र, माझी जबाबदारी’ या नावाने व्हॉट्सअप ग्रुपची निर्मिती. या ग्रूपवर सर्व गोष्टींची माहिती देणे. यामध्ये रोहित्राची किंवा वीज वाहिनीची देखभालीबाबत सूचना करणे आदींचा समावेश आहे.

  उपक्रमाचा फायदा:  ज्या रोहित्रांची निवड या उपक्रमांत केली आहे. त्या रोहित्रांची व परिसरातील वीज खांबांची, तारांची दुरुस्ती करण्यासाठी महावितरणने त्या भागात तातडीने अतिरिक्त मनुष्यबळ पाठवून सर्व कामे केली. नवीन १७ कनेक्शन दिली. रोहित्रपेटीची दुरुस्ती केली. किटकॅट बदलले. ज्या १२ रोहित्रांवर हा उपक्रम सुरु आहे. १२ पैकी ४ रोहित्रांची क्षमता सुद्धा वाढविण्यात येत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे पिकांचे संभाव्य नुकसान टळले आहे. त्यांचा भार आता नियंत्रणात असून रोहित्र जळण्याची चिंता नाही.

  समस्या एका दिवसात निकाली
  आमचा डीपी वारंवार जळत असल्याने आम्ही पूर्वी फार त्रस्त होतो. आता ‘माझे रोहित्र, माझी जबाबदारी’ उपक्रमात सहभागी झाल्यामुळे आमच्या डीपीवरील सर्व आकडे काढून त्यांना नवीन कनेक्शन दिले आहेत. वाकलेले खांब सरळ करुन तारांचे झोळ काढले आहेत. डीपीवरील सर्व समस्या एका दिवसांत निकाली निघाल्या. माझ्या रोहित्रावर आता कसलीही थकबाकी नाही. भविष्यात ती होऊ न देण्याची आमची जबाबदारी आहे.
  महेंद्र काशिद, बोत्रे डीपी प्रमुख, मांडवगण

  ऑफिसला जायची गरज पडली नाही नव्या उपक्रमात आमच्या डीपीचा समावेश महावितरणने केल्याने आम्ही आनंदी आहोत. आम्ही बिले भरताच आमच्या सर्व समस्या निकाली काढल्या. त्यासाठी कुठल्या ऑफिसला जाऊन अर्ज करण्याची व कुणाला भेटण्याची गरज आम्हाला पडली नाही. वीज कंपनीचे आभार.

  सुरेश परदेशी, शेतकरी तथा परदेशी डीपी प्रमुख, मांडवगण

  रोहित्र जळण्याचे प्रमाण घटणार वारंवार जळणाऱ्या रोहित्राची प्राधान्याने निवड केल्याने माझ्या कार्यक्षेत्रातील रोहित्र जळण्याच्या प्रमाणात घट होईल. चांगली सेवा दिल्यामुळे ग्राहकांना वीजबिले भरण्याची सवय व रोहित्राप्रती समर्पित भावना वाढी लागेल. रोहित्रांवरील समस्या दूर करण्यासाठी मुख्य अभियंता पावडे साहेबांनी मला सर्वोतोपरी सहकार्य केले आहे. - मतीन मुलाणी, मांडवगण शाखा अभियंता, महावितरण