जखमी घुबडाला मिळाले जीवदान! कावळ्यांच्या हल्ल्यातून सुटका

डॉ. कुंभार यांनी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागातील रत्नशंकर निसर्ग मंडळामार्फत अकलूज परिसरात जखमी झालेल्या अनेक पक्षी व वन्यप्राण्यावर उपचार करून निसर्गात सोडून जीवदान दिले आहे. या कामात प्राणी शास्त्र विषयाचे इतर प्राध्यापक व विद्यार्थी कार्यकर्त्यांच्या अनमोल सहकार्य लाभले आहे.

    अकलूज: माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील मसूदमळा परिसरात कावळे आणि गव्हाणी घुबड यांच्या धुमश्चक्रीत जखमी झालेल्या घुबडावर येथील पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांनी उपचार केल्याने जीवदान मिळाले. मसूदमळा परिसरात राहणारे ज्येष्ठ नागरिक नारायण घुले यांनी घाबरलेल्या अवस्थेत हताश होऊन पडलेल्या घुबडाला संरक्षण देत विनाविलंब डॉ. अरविंद कुंभार यांना कळविले. डॉ. कुंभार यांनी सदर घुबडाला प्रथमोपचार करून दिवसभर विश्रांती अवस्थेत ठेवून रात्रीच्या वेळी त्याच परिसरात मुक्त विहारसाठी सोडून दिले.

    घुबडा विषयी माहिती देताना डॉ. कुंभार म्हणाले की भारतात एकूण पाच प्रकारचे घुबड आढळतात व ते निशाचर आहेत. दिवसा गड-किल्ले, घुमट बुरुज आधी पुरातन वास्तू मध्ये मनुष्य वास्तव्य नसलेल्या ठिकाणी तसेच दाट झाडांच्या ढोलीत निद्रीस्त होउन विश्रांती घेत असतात. सूर्यास्तानंतर उंदीर, घूस, साप-सरडे व कधीकधी लहान पक्षी यासारख्या खाद्यांच्या शोधात बाहेर पडतात. मान १८० अंशांच्या कोनामध्ये फिरण्याचे वैशिष्ट्य असलेले या पक्ष्यांच्या अंगावर अतिशय तलम पिसे असतात.‌ उदी रंगाच्या पिसावर काळे चिपके तसेच चेहरा माणसासारखे वाटत असल्यामुळे ते रुबाबदार व भेदक वाटतात. मानवी समाजात घुबडा विषयी अनेक गैरसमज आहेत. याचे दर्शन झाल्यास मोठे संकटाला सामोरे जावे लागते; घुबड घरात शिरल्यास काही दिवसांकरिता वास्तव्य सोडावे लागते तसेच एखाद्याने घुबडाकडे दगड भिरकावल्यास ते दगड पायात धरून घोळवतो व जसे दगड झिजतो त्याप्रमाणे दगड भिरकावणाऱ्याचे शरीरपण झिजते वगैरे गैरसमज आहेत. घुबड शेतकऱ्यांना अतिशय उपकारक आहेत. माणसांनी त्यांच्या वंशावर बेतू नये या हेतूने पूर्वजांनी घुबडांना भिऊन त्यापासून दूर राहावे या हेतूने या गैरसमजा पसरवल्याचे मत डॉ.कुंभार यांनी व्यक्त केले.

    डॉ. कुंभार यांनी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागातील रत्नशंकर निसर्ग मंडळामार्फत अकलूज परिसरात जखमी झालेल्या अनेक पक्षी व वन्यप्राण्यावर उपचार करून निसर्गात सोडून जीवदान दिले आहे. या कामात प्राणी शास्त्र विषयाचे इतर प्राध्यापक व विद्यार्थी कार्यकर्त्यांच्या अनमोल सहकार्य लाभले आहे.

    कावळ्यांच्या हल्ल्यातून सुटका केलेला जखमी अवस्थेत आढळलेला घुबड हा गव्हाणी घुबड प्रकाराचा आहे. इंग्रजीत या घुबडाला बार्न आऊल या नावाने ओळखतात. अकलूज येथील अकलाई मंदिर व भुईकोट किल्ला परिसरात व माळीनगरच्या साखर कारखाना परिसरातील जुन्या वृक्षांवर या घुबडांचा वावर आहे.

    - डॉ. अरविंद कुंभार, पक्षी अभ्यासक