जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे सह्याद्री वाहिनीवरुन होणार थेट प्रक्षेपण -जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या तयारीबाबत माहिती देऊन कार्यक्रम स्थळ व परिसराची पाहणी केली. कार्यक्रम सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी घरातूनच अभिवादन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पुणे: कोरोनाचा संसर्ग वाढू नये, तसेच नागरिकांना आपल्या घरातून जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम पाहता यावा, यादृष्टीने सह्याद्री वाहिनीवरून या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्याचे नियोजन केले असून नागरिकांनी गर्दी टाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले. कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम स्थळाची पाहणी आज जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केली. तसेच येथे करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते. बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख व सचिन बारावकर, पेरणे चे सरपंच रुपेश ठोंबरे, कोरेगाव भीमा विजयस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, विविध विभागांचे अधिकारी, विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, १ जानेवारी रोजी जयस्तंभास अभिवादन करण्यास येणाऱ्या नागरिकांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पल्स ऑक्सीमीटर व थर्मामीटर तपासणी करावी, सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे, सोशल डिस्टन्सिंगच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, पिण्याच्या पाण्याची सोय करावी आदी सूचना देऊन आरोग्य पथके, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त, अग्निशमन दल, पार्कींग सुविधा, वाहतूक व्यवस्था, विद्युत व्यवस्था, फिरत्या स्वच्छतागृहांची सोय इत्यादी बाबींचा यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी आढावा घेतला.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या तयारीबाबत माहिती देऊन कार्यक्रम स्थळ व परिसराची पाहणी केली. कार्यक्रम सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी घरातूनच अभिवादन करण्याचे आवाहन त्यांनी केले.