रेटवडीची स्मार्ट ग्राम दिशेने दमदार वाटचाल : सरपंच गौरी पवार

  राजगुरूनगर : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील जागृत देवस्थान श्री रोकडोबा महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रेटवडी गावच्या सरपंचपदी मला व उपसरपंचपदी निलम सुभाष हिंगे यांना काम करण्याची संधी देऊन ग्रामस्थांनी खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान वाढविला. अवघ्या चार महिन्याच्या कालावधीत खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्षा, पंचायत समिती सभापती व सदस्या यांच्या माध्यमातून गावात दोन ते अडीच कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे सर्व सदस्य व ग्रामसेवक यांच्या सहकार्यातून रेटवडीची स्मार्ट ग्राम दिशेने दमदार वाटचाल सुरू असल्याचे सरपंच गौरी नवनाथ पवार यांनी सांगितले.

  रस्ते व पाणी समस्या सोडविण्यात यश

  गावात रस्त्यांचे जाळे निर्माण करून गावातील शेतकरी, नोकरदार, विद्यार्थी यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. गावातुन चासकमान धरणाचा डावा कालवा गेल्यामुळे आज गाव संपूर्ण ओलिताखाली आलेले आहे. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांचा शेतमाल शेतातून बाहेर काढून बाजारपेठत नेण्यासाठी रस्त्यांचे जाळे निर्माण झाल्याने फायदा होणार आहे. गावातील पाण्याचा साठा वाढविण्यासाठी गावात दोन के.टी बंधाऱ्यासाठी ५२ लक्ष रुपये मंजूर झाले असून त्याचा गावाला चांगला फायदा होणार आहे. गावात अनेक पाणंद रस्ते मोकळे करण्याचं काम चालू आहे.

  आदिवासी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध

  गावात दोन ठाकरवाड्या असून त्या डोंगराच्या कुशीत वसलेल्या आहेत. तेथील नागरिकांसाठी ठक्करबप्पा योजनेतून निधी उपलब्ध करून रस्त्यांचे ९० टक्के काम मार्गी लागले आहेत. या ठिकाणी २४ तास वीज व पाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. भविष्यात आदिवासी बांधवाना शासकीय योजना आणि घरकुलांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचा माझा प्रयत्न चालू राहणार आहे,असा निश्चय सरपंच पवार यांनी व्यक्त केला.

  विकासकामे प्रगतीपथावर

  गावात आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चार हायमास्ट दिवे बसविले आहेत. अतिवृष्टीमुळेमुळे स्मशानभूमीचे मोठे नुकसान झाले होते. त्यासाठी २६ लक्ष मंजूर होऊन ते काम सध्या प्रगतीपथावर असून लवकरच पूर्ण होऊन ग्रामस्थांचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. गावातील सर्वात गहन प्रश्न असणाऱ्या भगतवस्ती तसेच विकासनगरला जाण्यासाठी १९ लक्ष रुपये मंजूर झाले आहे. रेटवडी येथील जरेवाडी रस्ता २० लक्ष तसेच रोकडोबा महाराज मंदिर पठार येथे रस्ता २० लक्ष रुपये मंजूर झाले आहे.

  बंगलावस्ती रस्ता काँक्रीटीकरण २० लक्ष, ठाकरवाडी रस्ता काँक्रीटीकरण ७.५ लक्ष सतारकावस्ती येथे एक ५ लक्ष रुपयांचे पत्राशेड, सतारकावस्ती शाळा रस्ता ३ लक्ष, ठाकरवाडी येथे २ लक्ष रुपयांचे पत्राशेड तसेच १४ व्या वित्त आयोगातून ३ आरओ प्लांट बसवण्यात आले आहेत. विकासनगर संरक्षण भिंतीसाठी २० लक्ष रुपये मंजूर झाले आहेत. लहान मोठे अनेक रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला असून काम प्रगतीपथावर आहे. स्वामी अमरानंद सरस्वती महाराज यांनी भव्य कमान सतारकावस्ती रस्त्याकरिता दिली असून काम चालू आहे. १५ व्या वित्त आयोग मधील निधी उपलब्ध असून त्यामधून बहुतांशी कामे मार्गी लावण्याचा निर्धार आहे,असे सरपंच पवार यांनी सांगितले.

  डिजिटल ग्रामपंचायत

  ग्राम निधीमधून रेटवडी गावातील ग्रामपंचायत कार्यालय व सर्व इमारतीला रंगकाम व इतर दुरुस्ती करून ग्रामपंचायत हायटेक करण्यात आली आहे. ग्रामस्थांना आवश्यक माहिती व कागदपत्रे संगणकाद्वारे त्वरित मिळण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

  कोरोनामुक्त गाव

  कोरोनाच्या काळात लोकसंख्येच्या मानाने गाव मोठे असताना देखील कोरोनाला मोठ्याप्रमाणात गावात शिरकाव करून दिला नाही. त्यासाठी संपूर्ण गावात सॅनिटायझर फवारणी, शासकीय नियमांचे काटेकोर पालन करणे, मास्क वापरणे तसेच लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून पोलीस अधिकारी, पोलिसपाटील, सर्व सदस्य यांच्या माध्यमातून गावातील संपूर्ण वाड्यावस्त्यांवर जनजागृती फेरी आयोजित करण्यात आली. ठिकठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले.

  कोरोना रुग्णांच्या घरी जाऊन सॅनिटायझर फवारणी करणे घरातील इतर व्यक्तींना गोळ्या औषधें पुरवणे, कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन लोकांची तपासणी करणे व गावातील कोरोनाचे प्रमाण आटोक्यात येण्यासाठी गावात लसीकरण राबवून आतापर्यंत ४५ वरील ८०टक्के नागरिकांना दुसरा डोस तर १८ वर्षांवरील ७० टक्के नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहयोगाने लवकरच गावात शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

  जिल्हा परिषद शाळांकडे विशेष लक्ष

  गावातील सतारकवस्ती येथे जिल्हा परिषदे शाळा राज्यातील एक आदर्श शाळा म्हणून नावारूपाला आली आहे. या शाळेच्या नवीन इमारतीसाठी जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायतची ३ एकर जागा उपलब्ध करून दिलेली आहे. भविष्यात सीएसआर निधीतून शाळेसाठी बांधकाम करून खेड तालुक्याच्या पूर्व भागातील एक सर्वात मोठी शाळा म्हणून नावारूपास आणण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्व सहकार्य करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना उच्च प्रतीचे शिक्षण मिळणार आहे.

  आगामी संकल्प

  दलितवस्ती अंतर्गत रस्ते, गटार योजना, समाजमंदिर सुधारणा यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध व्हावा,यासाठी माझा पाठपुरावा चालू आहे. गावातील कचरा समस्या सोडवण्यासाठी कचरा निर्मूल करण्यावर माझा जास्त भर राहणार आहे. गावात रस्त्यांच्या दुतर्फा लाईट, गटार योजना तसेच जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरात नळ व पाणी उपलब्ध करून देण्यासाठी माझा इतर सहकाऱ्यांच्या मदतीने पाठपुरावा चालू आहे.

  पुढील पाच वर्षांच्या कालावधीत इतर सहकाऱ्यांच्या मदतीने रेटवडी गाव तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात आदर्श गाव करण्यासाठी माझा सर्वोतपरी प्रयत्न आहे.

  – गौरी पवार, सरपंच

  (शब्दांकन : अमितकुमार टाकळकर)