ज्ञानाचा फायदा समाजाच्या विकासाकरिता करावा : कुलगुरू डॉ.के.पी.विश्वनाथा

अहमदनगर:  शिकणे ही सतत चालणारी प्रक्रिया असुन मनुष्य हा लहानपणापासुन शेवटपर्यंत सतत काही ना काही शिकत असतो. भारत हा आयटी तंत्रज्ञानात अग्रेसर असून आपल्या या ऑनलाईन प्रशिक्षणात एक वक्त्याचे भाषण १५०० नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थींपर्यंत पोहोचणे ही या तंत्रज्ञानाची करामत आहे. तुम्ही स्वतः शिक्षित होत असतांना मिळविलेल्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा समाजातील इतर घटकांना ही कसा होईल हे पहा आणि स्वतः व समाजाच्या विकासाकरीता प्रयत्नशील रहा,असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.के.पी.विश्वनाथा यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंंद्र या प्रकल्पातंर्गत व्यवसायीक कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढविण्या साठी सॉफ्ट स्कीलचा वापर या विषयावरील एका आठवड्याचे ऑनलाईन प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथा बोलत होते. याप्रसंगी अभियांत्रिकी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.दिलीप पवार,पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. यशवंत फुलपगारे, डॉ.मिलिंद अहिरे, डॉ.मुकुंद शिंदे उपस्थित होते.

कुलगुरु डॉ.विश्वनाथा म्हणाले की, पूर्वीचा काळ आणि आताचा काळ यामध्ये खूप फरक असून दिवसेंदिवस नवनविन तंत्रज्ञानाची भर पडत आहे. प्रत्येकाने वेळेचे योग्य नियोजन केले तरच आपण योग्य ध्येयापर्यंत वाटचाल करु शकु.याबरोबरच प्रत्येकाने आपली प्रतीकारकक्षमता वाढविण्याकडे भर दिले पाहिजे.