पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी खेडमध्ये १० गावांतील जागेची मोजणी पूर्ण

    राजगुरुनगर : केंद्र व राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठीच्या मार्गिका मोजणीचे काम खेडमध्ये अतिजलद गतीने सुरू आहे. आतापर्यंत तालुक्यातील २१ पैकी १० गावांतील जागेच्या मोजणीचे काम पूर्ण झाले आहे, तर पुढील आठवड्यात ३ गावातील मोजणी पूर्ण होणार असल्याची माहिती खेड उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.

    सुरवातीला प्रकाल्पास विरोध दर्शविणाऱ्या टाकळकरवाडी येथे सुसंवादातून समन्वय साधून नुकतीच मोजणी पूर्ण करण्यात आली. याप्रसंगी महसूल नायब तहसीलदार संजय शिंदे, मंडल अधिकारी सविता घुमटकर, तलाठी बबन लंघे, सरपंच शारदा टाकळकर, उपसरपंच राजाराम टाकळकर, महारेलचे एस. आर. शिरोळे व मंदार विचारे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सद्यस्थितीत खेडमध्ये एकूण १५७ हेक्टर संपादित होणाऱ्या क्षेत्रापैकी सुमारे ६८ हेक्टर जमीन मोजणीचे काम पूर्ण झाले आहे.

    दरम्यान, पुणे-नाशिक शहरांसह पुणे, नगर आणि नाशिक या जिल्ह्यांतून सेमी हायस्पीड रेल्वे जाणार आहे. त्यासाठी पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील एक हजार ४७० हेक्‍टर जमीन संपादित करणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, जुन्नर आणि आंबेगाव या चार तालुक्यां‍तून लोहमार्गासाठी ५७५ हेक्‍टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे.

    भूसंपादनासंदर्भात रेल्वे विभागाने यापूर्वी प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यावर कार्यवाही सुरू आहे. पुणे जिल्ह्यात ५७५ हेक्‍टर जमीन संपादित होणार आहे. थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून जमिनीची खरेदी केली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रेल कार्पोरेशनच्या सूत्रांनी दिली.