
कवठे येमाई : शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील कवठे येमाईच्या काळूबाई नगर परिसरात गेल्या ८ दिवसांपासून सातत्याने नागरिकांना बिबट्यांचे दर्शन होत आहे. बुधवारी (दि.२२) दोन पट्टेरी वाघांचे दर्शन झाल्याचे तारा दिनकर शितोळे, राजेंद्र नथू कांदळकर या शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, पट्टेरी वाघ आपल्या भागात नसून ते बिबटे असावेत असा अंदाज शिरूरच्या वनपाल चारुशीला काटे यांनी वर्तवला. या बिबट्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दिवसाही होतेय दर्शन
काळूबाई नगरच्या तारा दिनकर शितोळे या आपल्या कुटुंबासह शेतात वस्ती करून राहत आहेत. या भागात ऊसाचे फार मोठे क्षेत्र असल्याने बिबट्यांना निवाऱ्यासाठी जागाही मुबलक आहे. तशातच मागील आठ दिवसांपासून तारा यांच्या राहत्या घराच्या परिसरात या दोन बिबट्यांचे त्यांना सातत्याने दिवसाही दर्शन होत आहे.
कोंबड्याही केल्या फस्त
तारा यांच्या घरासमोरच कोंबड्याचे खुराडे असून, या २ बिबट्यांनी खुराडे तोडून काही कोंबड्या फस्त केल्याचे त्यांनी सांगितले. तर राजेंद्र कांदळकर यांना देखील बुधवारी सकाळी सहाच्या दरम्यान बिबट्यांचीही जोडी पाहावयास मिळाली. त्यांनी आरडाओरडा केल्याने ही जोडी तेथून पळाली व तारा शितोळे यांच्या घराशेजारीच असलेल्या ऊसात डरकाळ्या फोडत सकाळी १० वाजेपर्यंत बसूनच होती.
दरम्यान, याबाबतची माहिती शिरूर वनविभागास देण्यात आल्यानंतर वनरक्षक ऋषिकेश लाड, वन कर्मचारी हनुमंत कारकूड तात्काळ काळूबाई नगरला दाखल झाले. परिस्थितीची पाहणी करून नागरिकांना दक्षता घेण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. तर शिरूरच्या वनपाल चारुशीला काटे यांनी बिबट्यापासून संरक्षण व्हावे म्हणून नागरिकांनी रात्री घराबाहेर पडू नये.
दिवसाही घबरदारी घ्या
दिवसाही शेतीकाम करताना अत्यंत खबरदारी घ्यावी असे आवाहान केले आहे. तर या ठिकाणी तात्काळ पिंजरा लावावा ही येथील नागरिकांची मागणी लक्षात घेत लवकरच येथे पिंजरा लावण्यात येईल, असे आश्वासन शिरूरचे वन परिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, वनपाल चारुशीला काटे, वनरक्षक लाड यांनी दिले आहे.