पुण्यात गुटखा विक्रेत्यांवर मोठी कारवाई; ३० ठिकाणी छापेमारी

शहरात पुणे पोलिसांनी तब्बल ३० ठिकाणी एकाचवेळी छापेमारी करत गुटखा रॅकेटबस्ट करण्यात आले आहेत. या कारवाईत दलाल, किरकोळ विक्रेते यांच्यासोबतच किराणा दुकानात गुटखा ठेवून विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे.

    पुणे : शहरात पुणे पोलिसांनी तब्बल ३० ठिकाणी एकाचवेळी छापेमारी करत गुटखा रॅकेटबस्ट करण्यात आले आहेत. या कारवाईत दलाल, किरकोळ विक्रेते यांच्यासोबतच किराणा दुकानात गुटखा ठेवून विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. पुणे पोलीसांनी पहाटेपासून छापेमारी करत ही मोठी कारवाई केली आहे. अद्यापही ही कारवाई सुरू असून, ६ पथकांची नेमणूक करत एकाचवेळी छापेमारी केली आहे. भल्या पहाटे कारवाई झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांनी यापूर्वीच्या कारवायांत थेट उत्पादकांसह त्यांची वाहतूक करणाऱ्या व्यक्तींना समोर आणले होते.

    शहरात गुटखा विक्री तेजीत सुरू आहे. टपऱ्यांटपऱ्यावर आणि किरणा दुकानांमध्ये गुटखा मिळतो. स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेला मॅनेजकरून हे छोटे विक्रेते बिझनेस करतात. तर, मोठे दलाल त्यांना आवश्यक माल पुरवतात. या दलालांचे साठवणूक करणारे मोठे अड्डे (गोडाऊन, अथवा फ्लॅटमध्ये) आहेत. तेथून हा गुटखा शहरात विकला जातो.

    दरम्यान, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पदभार स्विकारल्यानंतर गुटखा कारवाई तेजीत सुरू केली. तसेच, फक्त शहरापूरती मर्यादित ही कारवाई न ठेवता उत्पादकांपर्यत कारवाईचा बडगा उचलण्यात आला. परराज्यात देखील पुणे पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई थंडावल्यानंतर मात्र शहरात पुन्हा गुटखा विक्रेते तेजीत सुरू झाले. सध्या गुटखा टपऱ्या टपऱ्यांवर मिळत आहे. हा प्रकार लक्षात येताच पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाईचा दणका दिला आहे.

    भल्या पहाटे पोलिसांची कारवाई

    शहरातील विविध भागात आज पहाटे पथकांनी एकाचवेळी छापेमारे केली आहे. यात पोलिसांनी ३० ठिकाणे निश्चित केली होती. त्या तीसही ठिकाणी छापे टाकण्यात आले. काही ठिकाणी पोलीसांना माल सापडला नाही. तर, बहुतांश ठिकाणी पोलीसांची कारवाई ‘सक्सेसफुल’ झाली आहे. यात गोडाऊनमध्ये ठेवलेल्या ठिकाणांचा समावेश आहे. अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या सहा पथकांनी पहाटेपासून ही कारवाई केली आहे.