गुजरात ATSची पुण्यात मोठी कारवाई ;२००६ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश

१९ फेब्रुवारी २००६ रोजी कालूपूर रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. याप्रकरणी आतापर्यंत १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. मोहसीन हा या प्रकरणी अटक झालेला तेरावा आरोपी आहे, तर १० आरोपींचा अद्याप शोध सुरू आहे. हे सर्व आरोपी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत.

    पुणे : गुजरात ATSने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. गुजरात अहमदाबादमधील कालूपूरमध्ये २००६ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे.

    मोहसीन पूनावाला असं या आरोपीचं नाव असून गुजरात एटीएसने वानवडी पोलिसांच्या मदतीने मंगळवारी (ता.२४) रात्री उशिरा वानवडी येथील राहत्या घरातून अटक केली. सोळा वर्ष फरार असलेला अब्दुल गाजी गुजरात एटीएसच्या हाती लागल्यानंतर मोहसीनची माहिती पुढे आली होती. त्यानंतर गुजरात एटीएसने ही कारवाई केली. हा बॉम्बस्फोट घडवण्यासाठी पाकिस्तानची गुप्तहेर एजन्सी आयएसआयला गाजी आणि मोहसिन यांनी मदत केली होती आणि देशविघातक कृत्य केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

    सतत घर बदलत राहायचा
    ​सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी मोहसीनने पुण्यात अनेक घरे बदलली होती.तसेच तो खूप कमी वेळा घराबाहेर पडायचा. घराजवळच असलेल्या मदरशामध्ये तो शिकवणी घ्यायचा. तसेच दहशतवादाचं प्रशिक्षण घेण्यासाठी तो पाकिस्तानमध्येही जाऊन आला होता. १९ फेब्रुवारी २००६ रोजी कालूपूर रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. याप्रकरणी आतापर्यंत १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. मोहसीन हा या प्रकरणी अटक झालेला तेरावा आरोपी आहे, तर १० आरोपींचा अद्याप शोध सुरू आहे. हे सर्व आरोपी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत.