प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

फिर्यादींना चारचाकी गाडीत डांबून ठेवत दमदाटी केली आणि रिव्हॉल्वरच्या धाकाने फिर्यादीच्या मालकीची वढू खुर्द भागातील ३ हेक्‍टर ७१ आर जमीनीचे गहाणखत केले आणि ६ कोटी ७५ लाख रूपये परस्पर बॅंकेतून काढून घेतले.

    पुणे: शेतकऱ्याची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास विठ्ठल बांदल (वय ४५, रा. मु.पो. शिक्रापूर, ता. हवेली) याला आणखी एका गुन्ह्यात गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून न्यायालयाने त्याला २३ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

    त्यांच्याविरोधात एका७४ वर्षीय शेतकऱ्याने लोणीकंद पोलिसात फिर्याद दिली आहे. वढू खूर्द भागात २०१३ आणि त्यानंतरच्या कालावधीत हा प्रकार घडला. आरोपी मंगलदास बांदलसह इतर आरोपींनी शिवाजीराव भोसले बॅंकेतील अधिकाऱ्याशी संगणमत केले. तसेच फिर्यादींना चारचाकी गाडीत डांबून ठेवत दमदाटी केली आणि रिव्हॉल्वरच्या धाकाने फिर्यादीच्या मालकीची वढू खुर्द भागातील ३ हेक्‍टर ७१ आर जमीनीचे गहाणखत केले आणि ६ कोटी ७५ लाख रूपये परस्पर बॅंकेतून काढून घेतले.

    तसेच जमिनीवरील बोझा कमी करण्यासाठी आरोपींनी फिर्यादींकडे १ कोटी रूपयांची मागणी केली आहे. तसेच अद्याप बोझा कमी केला नसल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी पुणे शहर गुन्हे शाखा युनिट ६ ने मंगलदास बांदल यास अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली.