खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त खेडमध्ये भव्य लसीकरण मोहीम

    चाकण : खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘जगदंब प्रतिष्ठान’ने शिरूर लोकसभा मतदारसंघात ५ लाख नागरिकांचे लसीकरण (Vaccination) करण्याची मोहीम हाती घेतली असून, आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते पहिल्या टप्प्यात खेड तालुक्यातील ५० हजार नागरिकांचे लसीकरण मोहिमेचा शुभारंभ चाकण ग्रामीण रुग्णालयात रविवारी (दि. २६) करण्यात आला.

    सीरम इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने ‘जगदंब प्रतिष्ठान’ने या लसीकरण मोहिमेसाठी ५ लाख लसीच्या मात्रा उपलब्ध करून दिल्या असून नोबल हॉस्पिटल व पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व अधिकृत केंद्रांवर लसीकरण केले गेले. या कार्यक्रमाचे उद्घाटन चाकण ग्रामीण रुग्णालय येथे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले.

    खासदार डॉ. कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर लोकसभा मतदारसंघात सुमारे पाच लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचा संकल्प ‘जगदंब प्रतिष्ठान’ने केला होता. सुरुवातीला टप्प्याटप्प्याने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ५० हजार आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित लसीच्या मात्रा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जगदंब प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अमोल हारपळे व तेजस झोडगे यांनी दिली.

    लसीकरण कार्यक्रम आयोजित

    गतवर्षी पासून सुरू झालेल्या कविड १९ संकटावर मात करण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याने शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण व्हावे यासाठी ‘जगदंब प्रतिष्ठान’ने पुढाकार घेतला असून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर-हवेली, भोसरी व हडपसर या सहाही विधानसभा क्षेत्रात लसीकरणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले.