बापरे !मॅकडोनाल्डची फ्रँचायजी पडली साडेआठ लाखांना

पुणे : मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रँचायजी देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने एकाला ऑनलाईन तब्बल ८ लाख ५६ हजारांना गंडा घातला. ही घटना ७ ते १४ सप्टेंबरमध्ये खडकीत घडली. याप्रकरणी नामदेव भापकर (वय ४७, रा. खडकी)यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामदेव यांना व्यवसायासाठी मॅकडोनाल्डची फ्रॅन्चायसी हवी होती. त्यासाठी ते ऑनलाईनरित्या पाहणी करीत होते. त्यावेळी सायबर चोरट्याने त्यांना फोन करुन विश्वास संपादित केला. मॅकडोनाल्डची फ्रँचायजी देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी सायबर चोरट्याने नामदेव यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाईनरित्या रक्कम बँकखात्यात जमा करुन घेतली. तब्बल ८ लाख ५६ हजार रुपये पाठवूनही फ्रँचायजी मिळत नसल्यामुळे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक शफिल पठाण अधिक तपास करीत आहेत.