गुंड व वाळू व्यावसायिक संतोष जगतापचा खून करणाऱ्या आरोपींवर मोक्का कारवाई

महादेव आदलिंगे हा टोळी प्रमुख असून, त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. खून, खूनाचा प्रयत्न अशा गुन्ह्यांचा त्यात समावेश आहे. दरम्यान, या टोळीची लोणी काळभोर परिसरात दहशत आहे. त्यांनी आर्थिक फायद्यासाठी गुन्हेगारी कृत्ये केली आहेत. त्यांनी टोळीचे वर्चस्व ठेवण्यासाठी तसेच २०११ साली यातील आरोपी उमेश सोनवणे याच्या भावाचा व चुलत्याचा खूनाचा बदला घेण्यासाठी कटरचून कुविख्यात गुंड संतोष जगताप याचा गोळ्या घालून खून केल्याचे समोर आले आहे.

    पुणे : कुविख्यात गुंड आणि वाळू व्यावसायिक संतोष जगताप खून प्रकरणातील आरोपींवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कारवाई केली आहे. गुन्ह्याचा मास्टर माईंड आणि टोळी प्रमुख महादेव आदलिंगे यांच्यासह सहा जणांचा समावेश आहे. या कारवाईने लोणी काळभोर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस आयुक्तांची ही ६० वी मोक्का कारवाई आहे.

    महादेव बाळासाहेब आदलिंगे (वय २८, रा. उरूळी कांचन), स्वागत बापु खैरे (वय २५), पवन उर्फ प्रशांत गोरख मिसाळ (वय २९,), उमेश सोपान सोनवणे (वय ३५), अभिजीत अर्जुन यादव (वय २२, ता. बारामती), आकाश उर्फ बाळू जगन्नाथ वाघमोडे (वय २८) व महेश भाऊसाहेब सोनवणे (वय २८, रा. भांडवाडी वस्ती, ता. राहु) अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

    महादेव आदलिंगे हा टोळी प्रमुख असून, त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. खून, खूनाचा प्रयत्न अशा गुन्ह्यांचा त्यात समावेश आहे. दरम्यान, या टोळीची लोणी काळभोर परिसरात दहशत आहे. त्यांनी आर्थिक फायद्यासाठी गुन्हेगारी कृत्ये केली आहेत. त्यांनी टोळीचे वर्चस्व ठेवण्यासाठी तसेच २०११ साली यातील आरोपी उमेश सोनवणे याच्या भावाचा व चुलत्याचा खूनाचा बदला घेण्यासाठी कटरचून कुविख्यात गुंड संतोष जगताप याचा गोळ्या घालून खून केल्याचे समोर आले आहे. खूनप्रकरणात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या टोळीवर पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण व उस्मानाबाद शहरात एकूण १५ गुन्हे दाखल आहेत. त्यांची या भागात दहशत असल्याने त्यांच्याविरोधात तक्रार देण्यास घाबरतात. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी टोळीवर मोक्का कारवाईचा प्रस्ताव तयारकरून तो परिमंडळ पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्फत अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे पाठविला. त्यांनी प्रस्तावाची छाननी केली व तो प्रस्ताव मान्यतेसाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे पाठविला. यानुसार पोलीस आयुक्तांनी या टोळीवर मोक्का कारवाई केली आहे.

    पोलीस आयुक्तांची ही मोक्काची ६० वी कारवाई आहे. पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्विकारल्यानंतर अमिताभ गुप्ता यांनी गेल्या एक वर्षात ६० टोळ्यांवर मोक्का लावत जवळपास पाचशे गुन्हेगारांना कारागृहात पाठविले आहे. तर, एमपीडीएनुसार देखील कारागृहात सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.