बेपत्ता तरुणाचा थेट मृतदेहच आढळल्याने खळबळ

    शिरूर : शिरूर शहरातील संभाजीनगर हुडको या वसाहतीतील गेली दोन दिवस झाले एक तरूण बेपत्ता होता. त्याच्या कुटुंबियांनी व मित्रांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा सुगावा कुठेच लागत नव्हता. मात्र, बुधवारी (दि.२९) या तरुणाचा मृतदेह नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील नारायण गव्हाण येथे सापडला. मृतदेह सापडल्यानंतर त्या तरुणाचा खून (Youth Murder) झाला असावा असा संशय शिरूर येथील सकल जैन समाज यांनी व्यक्त केला.

    आदित्य संदीप चोपडा असे या तरुणाचे नाव असून, त्याचा मोठा मित्रपरिवार शिरूरमध्ये आहे. गेली दोन दिवस तो घरात परतलेला नव्हता. नारायण गव्हाण परिसरात त्याचा मृतदेह सापडल्यानंतर शिरूर शहरात प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याचा खून झाला आहे आरोपी सापडले पाहिजे, अशी जैन समाजाची मागणी आहे. जोपर्यंत त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होत नाही, तोपर्यंत शिरूर शहरातील संपूर्ण व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून निषेध नोंदवावा, अशी विनंती शिरूरमधील व्यापाऱ्यांना श्री जैन सकल समाज यांनी केली आहे.