अ‍ॅमेझॉनवरून मागवला मोबाईल अन मिळाले फक्त चार्जर व केबल…

डिलिव्हरी मिळाल्यानंतर पाटणी यांनी मोबाईलचा बॉक्स न उघडता तसाच ठेवला. काही वेळानंतर पाटणी यांच्या पत्नीने त्यांच्या घरात काम करणाऱ्या महिलेसमोर मोबाईलचा बॉक्स उघडला. त्यामध्ये केवळ मोबाईल चार्जर व केबल तसेच इतर डॉक्युमेंट असल्याचे दिसले.

    पिंपरी: खरेदीसाठी सर्रासपणे ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. मात्र यामध्ये बऱ्याचदा फसवणूकीच्या घटना घडतात. अशीच एका घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. एकाने अ‍ॅमेझॉन(Amazon) कंपनीकडून ऑनलाईन माध्यमातून मोबाईल(Mobile)  खरेदी केला. कंपनीने मोबाईलच्या नावाखाली पाठवलेले कुरियर ग्राहकाला मिळाले. मात्र, बॉक्समध्ये मोबाईलऐवजी केवळ चार्जर आणि केबल ग्राहकाला मिळाली. हा प्रकार हिंजवडी येथे घडला आहे.

    याबाबत विपुल विनोद पाटणी (वय ३३, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अ‍ॅमेझॉन कंपनी, डिलिव्हरी देणारे कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पाटणी हे एका कंपनीत काम करतात. त्यांनी रेडमी कंपनीचा मोबाईल १४ हजार ४९९ रुपयाला ऑर्डर केला. मोबाईलची डिलिव्हरी पाटणी यांना मिळाली.

    डिलिव्हरी मिळाल्यानंतर पाटणी यांनी मोबाईलचा बॉक्स न उघडता तसाच ठेवला. काही वेळानंतर पाटणी यांच्या पत्नीने त्यांच्या घरात काम करणाऱ्या महिलेसमोर मोबाईलचा बॉक्स उघडला. त्यामध्ये केवळ मोबाईल चार्जर व केबल तसेच इतर डॉक्युमेंट असल्याचे दिसले. बॉक्समध्ये मोबाईल आढळुन आला नाही. ती माहिती पत्नीने पाटणी यांना दिली. त्यांनी याबाबत अ‍ॅमेझॉन कंपनीला संपर्क केला. कंपनीने या प्रकरणाचा तपास करून कळवतो, असे सांगितले. अ‍ॅमेझॉन कंपनीकडून पाटणी यांना मेल आला. त्यात कंपनीने पाटणी यांना त्यांच्या ऑर्डरची सुरक्षित डिलिव्हरी केली असल्याचे सांगितले. याप्रकरणी पाटणी यांनी अ‍ॅमेझॉन कंपनी आणि डिलिव्हरी देणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात तक्रार दिली. हिंजवडी पोलिस तपास करत आहेत.