सातारा गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा ; शिक्षिकेकडे केली शरीरसुखाची मागणी

सातारा पंचायत समितीमध्‍ये गटशिक्षणाधिकारीपदी संजय धुमाळ हे कार्यरत आहेत. त्‍यांच्‍या अखत्‍यारीत असणार्‍या एका शाळेमध्‍ये शिक्षिका कार्यरत आहे. कामाच्‍या माध्‍यमातून धुमाळ यांनी जवळीक वाढवत शरीरसुखाची मागणी केल्‍याचे तसेच विनयभंग केल्‍याचे त्‍या शिक्षिकेने तक्रारीत नमुद केले आहे.

    सातारा : सातारा पंचायत समितीमध्‍ये गटशिक्षणाधिकारी पदी कार्यरत असणार्‍या संजय श्रीरंग धुमाळ (रा. गोडोली) याच्‍याविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्‍यात शनिवारी रात्री विनयभंगाचा गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. याबाबतची तक्रार एका शिक्षिकेने नोंदवली आहे.

    सातारा पंचायत समितीमध्‍ये गटशिक्षणाधिकारीपदी संजय धुमाळ हे कार्यरत आहेत. त्‍यांच्‍या अखत्‍यारीत असणार्‍या एका शाळेमध्‍ये शिक्षिका कार्यरत आहे. कामाच्‍या माध्‍यमातून धुमाळ यांनी जवळीक वाढवत शरीरसुखाची मागणी केल्‍याचे तसेच विनयभंग केल्‍याचे त्‍या शिक्षिकेने तक्रारीत नमुद केले आहे. कोणतेही काम नसताना शाळेत येवून एकटक बघणे, वारंवार फोन करणे, गाडीतून सोबत येण्‍यासाठी दबाव आणणे, शाळेत कोणताही त्रास देणार नाही, तुझ्‍याविरोधातील सर्व तक्रारी निकाली काढतो, असे सांगत धुमाळ हे वारंवार त्रास देत असल्‍याचेही त्‍या शिक्षिकेने तक्रारीत नमुद केले आहे.

    मी सांगतो, त्‍याप्रमाणे न वागल्‍यास तुझी नोकरी घालवेन, तुझे शैक्षणिक कामकाज खराब करेन असा दम देत धुमाळ यांनी भरतगाव तसेच शेंद्रे येथील कॉलेज परिसरात मानसिक त्रास देत विनयभंग केल्‍याचेही त्‍या शिक्षिकेने तक्रारीत नमुद केले आहे. याचा तपास सहाय्‍यक निरीक्षक अभिजीत चौधरी हे करीत आहेत.

    दरम्‍यान हे प्रकरण चर्चेत आल्‍यानंतर जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी त्‍या शिक्षिकेची तक्रार सातारा पंचायत समितीमधील विशाखा समितीकडे पाठवून देत चौकशी करण्‍याच्‍या सुचना गटविकास अधिकारी सुवर्णा चव्‍हाण यांना दिले होते. यानुसार चौकशीची कार्यवाही सुरु असतानाच त्‍या प्रक्रियेला छेद देत त्‍या शिक्षिकेने पोलिसांकडे धाव तक्रार नोंदविल्‍याने अनेकांच्‍या भुवया उंचावल्‍या आहेत.