महापालिकेत आता १० उपायुक्त तर १४ सहाय्यक आयुक्त; नव्याने २ उपायुक्त, ४ सहाय्यक आयुक्त पदनिमिर्तीस मान्यता

भविष्यात महापालिकेचा होणारा विस्तार, वाढलेली लोकसंख्या आणि त्या अनुषंगाने कामकाजात होणारी वाढ विचारात घेवून आयुक्त राजेश पाटील यांनी उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त संवर्गातील वाढीव पदांची आवश्यकता दर्शविली होती. त्या अनुषंगाने उपायुक्त, सहाय्यक आयुक्त संवर्गातील नवीन पदे निर्माण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

  पिंपरी: भविष्यात पिंपरी – चिंचवड महापालिकेचा होणारा विस्तार, वाढलेली लोकसंख्या आणि त्या अनुषंगाने कामकाजात होणारी वाढ विचारात घेवून महापालिकेच्या मागणीनुसार २ उपायुक्त आणि ४ सहाय्यक आयुक्त पदांच्या निमिर्तीस राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे महापालिकेत आता १० उपायुक्त आणि १४ सहाय्यक आयुक्त असणार आहेत. राज्य सेवेतील ५ उपायुक्त, ७ सहाय्यक आयुक्त आणि महापालिका सेवेतील ५ उपायुक्त, ७ सहाय्यक आयुक्त असा समसमान ‘कोटा’ निश्चित करण्यात आला आहे.

  पिंपरी महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश झाला आहे. महापालिकेच्या नवीन आकृतीबंध, सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियमांना मंजुरी मिळाली आहे. नवीन आकृतीबंधानुसार उपायुक्तांच्या पदाची निर्मिती झाली आहे. महापालिका आस्थापनेवर सध्या उपायुक्त संवर्गाची ८ पदे आणि सहाय्यक आयुक्त संवर्गाची १० पदे मंजूर आहेत. भविष्यात महापालिकेचा होणारा विस्तार, वाढलेली लोकसंख्या आणि त्या अनुषंगाने कामकाजात होणारी वाढ विचारात घेवून आयुक्त राजेश पाटील यांनी उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त संवर्गातील वाढीव पदांची आवश्यकता दर्शविली होती. त्या अनुषंगाने उपायुक्त, सहाय्यक आयुक्त संवर्गातील नवीन पदे निर्माण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

  महापालिका पत्राच्या अनुषंगाने महापालिका आस्थापनेवर उपायुक्त संवर्गातील २ पदे आणि सहाय्यक आयुक्त संवर्गातील ४ पदे नव्याने निर्माण करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या पदांना महापालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२० मधील तरतूदी लागू राहतील. महापालिकेच्या आस्थापनेवरील उपायुक्त व सहाय्यक आयुक्त पदांना असलेली शासन मान्य वेतनश्रेणी या पदांनाही लागू राहील, असे शासनाचे उपसचिव स.ज.मोघे यांनी स्पष्ट केले आहे.

  उपायुक्तांच्या ३ जागा रिक्त

  राज्य सेवेतील महापालिकेत प्रतिनियुक्तीवर असलेले उपायुक्त सुभाष इंगळे, नागरवस्ती विभागाचे अजय चारठणकर आणि कर आकारणी व संकलन विभागाच्या स्मिता झगडे महापालिकेत कार्यरत आहेत. राज्य सेवेतील २ उपायुक्तपदे रिक्त आहेत. तर, महापालिका सेवेतील भांडार विभागाचे मनोज लोणकर, कायदा विभागाचे चंद्रकांत इंदलकर, सुरक्षा विभागाच्या आशादेवी दुरगुडे आणि क्रीडा विभागाचे संदीप खोत असे ४ उपायुक्त कार्यरत आहेत. महापालिका सेवेतील अधिकाNयासाठीचे १ जागा रिक्त आहे.

  सहाय्यक आयुक्तांच्या ४ जागा रिक्त

  राज्य सेवेतील एलबीटी विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील आलमलेकर, निवडणूक विभागाचे बाळासाहेब खांडेकर, प्रशांत जोशी, प्रशासन विभागातील सुषमा शिंदे, आकाश चिन्ह परवाना विभागाचे निलेश देशमुख, ‘ड’ क्षेत्रीय अधिकारी उमाकांत गायकवाड, शिक्षण विभागाच्या ज्योत्स्ना शिंदे असे ७ जण कार्यरत आहेत. राज्य सेवेतील ‘कोटा’ पुर्ण झाला आहे. तर, महापालिका सेवेतील ‘क’ क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, ‘ग’ क्षेत्रीय अधिकारी श्रीनिवास दांगट आणि ‘फ’ क्षेत्रीय अधिकारी सिताराम बहुरे असे ३ जण सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत आहेत. महापालिका सेवेतील अधिकाऱ्यांसाठी राखीव असलेल्या ४ सहाय्यक आयुक्तांच्या जागा रिक्त आहेत.