महापालिका पीएमपीएमएलला देणार सव्वादोन कोटी; पीएमपीएमएलच्या मोफत प्रवासाचा २४०४ दिव्यांगांनी घेतला लाभ

पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडून २५ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या पत्रानुसार, सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाकरिता २४०४ पास वितरीत करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे

    पिंपरी: दिव्यांग, कर्णबधीर आणि १०० टक्के अंध नागरिकांना पीएमपीएमएल बस प्रवासासाठी मोफत पास देण्यात येतो.  २०२०-२१ या आर्थिक वर्षात शहरातील २४०४ दिव्यांगांनी या मोफत बस प्रवासाचा लाभ घेतला. या पासच्या खर्चापोटी पिंपरी – चिंचवड महापालिकेमारर्फत पीएमपीएमएलला २ कोटी २० लाख रूपये देण्यात येणार आहेत. पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाअंतर्गत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. २० जानेवारी २०११ रोजीच्या निर्णयानुसार, शहरातील अंध, नि:समर्थ, कर्णबधीर, मतिमंद व्यक्तींसाठी दिव्यांग विकासाच्या योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने विद्यार्थ्यांबरोबरच शहरातील ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या शहरातील सर्व ठिकाणच्या दिव्यांग, कर्णबधीर आणि १०० टक्के अंध नागरिकांना पीएमपीएमएल बस प्रवासासाठी मोफत पास देण्यास मान्यता देण्यात आली आहे. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये जाहीर प्रकटनाद्वारे यासाठी अर्ज मागविण्यात आले होते.

    पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडून २५ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या पत्रानुसार, सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाकरिता २४०४ पास वितरीत करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे. या पाससाठी खर्च झालेली २ कोटी २० लाख ७१ हजार रूपये इतकी रक्कम मिळण्याबाबत पीएमपीएमएल प्रशासनाने महापालिकेला विनंती केली आहे. त्यानुसार, ‘महापालिका हद्दीतील अंध, नि:समर्थ, कर्णबधीर, मतिमंद व्यक्तींना पीएमपीएमएलचे मोफत पास देण्याबाबत’ या उपलेखाशिर्षावरून २ कोटी २० लाख ७१ हजार रूपये ही रक्कम पीएमपीएमएलला देण्यात येणार आहे.