भोसरी रुग्णालयात महापालिका ऑक्सिजन प्लांट उभारणार

शहरामध्ये सध्या दररोज एक हजारापर्यंत कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत.गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे.ऑक्सिजनचा जाणवणारा तुटवडा लक्षात घेऊन महापालिकेने भोसरी येथे ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे नियोजन केले आहे.

    पिंपरी: कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता आणि ऑक्सिजनची वाढती गरज पाहता महापालिकेच्या वतीने भोसरी येथील नवीन रुग्णालयाजवळ ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे नियोजन केले आहे.त्यासाठी मोकळया निवासी विभागातील ४६५ चौरस मीटर क्षेत्र ताब्यात घेण्यात येणार आहे. महासभेने त्यास मान्यता दिली.

    शहरामध्ये सध्या दररोज एक हजारापर्यंत कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत.गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे.ऑक्सिजनचा जाणवणारा तुटवडा लक्षात घेऊन महापालिकेने भोसरी येथे ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे नियोजन केले आहे. भोसरी येथील नवीन रुग्णालयाचा पूर्वे कडील बाजूस असलेलीसर्वे क्रमांक १/३ पैकी ३० मीटर लांबीचा आणि १५.५० मीटर रुंदीच्या २४ मीटर रुंद रस्त्याला लागून असलेल्या मोकळया निवासी विभागातील ४६५ चौरस मीटर क्षेत्र महापालिकेच्या विकास योजनेत निवासी विभागात सामाविष्ट आहे. मोकळया निवासी विभागातील ४६५ चौरस मीटर क्षेत्र ऑक्सिजन प्लांटसाठी खासगी वाटाघाटीने ताब्यात घेण्यास आणि ताब्यात येणाऱ्या क्षेत्राचा मोबदला (३० टक्के दिलासा रकमेसह) संबंधिम नागरिकांना दिला जाणार आहे.त्यासाठी १३ हजार ३०० प्रति चौरस मीटर या दराप्रमाणे ८० लाख ३९ हजार ८५० रुपये इतके मूल्यांकन केले जाणार आहे.महापालिका जागा ताब्यात घेणार भोसरी येथील संबंधित जागेच्या मालकी हक्काबाबत सातबारा पत्रकावर सामाईक क्षेत्र म्हणून नोंद असून, अनेक नावे आहेत.त्यामुळे प्रत्यक्षात या जागेच्या मालकीचा बोध होत नाही.साथरोग अधिनियम १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा – २००५ मधील कलम ४१ अनुसार महापालिका सदर जागेबाबत मालकी हक्क सिध्द झाल्यानंतर संबंधित जागा मालकांना जागेचा मोबदला महापालिकेकडून अदा केला जाणार आहे. आज झालेल्या सर्वसाधारण सभेत या विषयास मान्यता देण्यात आली.