पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून ; पतीला अटक

मुरली व गोमती हे पती पत्नी असून ते संदीप रोझ नर्सरी येथे काम करतात. गोमती तिच्या पहिल्या पतीपासूनच्या मुलांना मध्य प्रदेश येथे कामातून मिळालेले पैसे पाठवत होती. त्यावरून त्यांच्यात सतत वाद होत होते. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांच्यात यावरून पुन्हा वाद झाले.

    पुणे : लोणी काळभोर परिसरातील सोरतपवाडी येथे पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना घडली. पत्नी पहिल्या पतींपासून झालेल्या मुलांना पैसे पाठवत असल्याच्या रागातून हा खून केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

    मुरली चैनू केवट (वय ३६, रा. संदीप रोझ नर्सरी, सोरतपवाडी, मूळ- मध्यप्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गोमती भोपाली केटक (वय ४९) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अमर पांगारकर (वय ४७, रा. महादेवनगर, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिसांत तक्रार दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरली व गोमती हे पती पत्नी असून ते संदीप रोझ नर्सरी येथे काम करतात. गोमती तिच्या पहिल्या पतीपासूनच्या मुलांना मध्य प्रदेश येथे कामातून मिळालेले पैसे पाठवत होती. त्यावरून त्यांच्यात सतत वाद होत होते. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांच्यात यावरून पुन्हा वाद झाले. त्यावेळी मुरली याने गोमती यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना खून केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तक्रारदार हे त्या ठिकाणी गेले. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. अधिक तपास उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड हे करत आहेत.