crime scene

    मंचर : भंगार विकलेल्या (Scrap) पैशांच्या कारणावरुन वाद करुन घोडेगांव येथे पती-पत्नीचा खून (Murder in Manchar) केल्याप्रकरणी तीन आरोपींना घोडेगांव पोलिसांनी अवघ्या आठ तासांत अटक केली. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक मिथेश गट्टे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लांभाते यांनी भेट दिली आहे.

    घोडेगांव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.२८) सकाळी संजय वाघ हे त्यांचा भाऊ किसन विकास वाघ (वय ४५) आणि भावजय मोंढाबाई किसन वाघ (वय ४१) यांना भेटण्यासाठी घोडेगांव येथे गेले होते. त्यावेळी मंगेश शकिल सईद, सोन्या जगण मुकणे आणि जगण मुकणे तेथे आले. किसन वाघ यांच्याशी भंगार विकलेल्या पैशांच्या कारणावरुन वाद करुन संबधित तिघे शिवीगाळ दमदाटी करु लागले. त्यावेळी संजय वाघ यांनी त्यांच्यामधील भांडणे सोडविली. त्यानंतर ते सर्वजण तेथुन निघुन जात असताना मंगेश सईद याने किसन वाघ यांना तुला आम्ही बघुन घेतो तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.

    सायंकाळी पाचच्या सुमारास संजय वाघ हे काम करत असलेल्या वीटभट्टी मालक संजय यांनी घरी येवुन सांगितले की किसन वाघ आणि त्यांची पत्नी मोंढाबाई वाघ यांना कोणीतरी मारहाण केली असून, ते राहत असलेल्या ठिकाणी जखमी अवस्थेत पडुन आहेत, असे समजल्यानंतर संजय वाघ त्यांच्या पत्नीसह किसन वाघ राहत असलेल्या घोडेगांव येथील स्मशानभुमी कचरा डेपोजवळ गेले असता तेथे त्यांचा भाऊ किसन वाघ आणि भावजय मोंढाबाई वाघ हे जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांच्या डोक्यात आणि तोंडावर जखमा होत्या. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

    पोलिसांनी किसन वाघ आणि मोंढाबाई वाघ यांना वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून उपचारापूर्वी मयत झाल्याचे सांगितले. मयत किसन वाघ यांचा भाऊ संजय वाघ यांनी मंगेश शकिल सईद, सोन्या जगण मुकणे, जगण मुकणे (सर्व रा. घोडेगाव) यांच्याविरोधात घोडेगांव पोलिस ठाण्यात बुधवारी पहाटे पावणे दोन वाजता फिर्याद दिली असुन, या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक जीवन माने करत आहे. घोडेगांव पोलिसांनी अवघ्या आठ तासांत खुन प्रकरणातील आरोपी मंगेश शकिल सईद, सोन्या जगण मुकणे, जगण मुकणे यांना अटक केली आहे.