रिक्षाचालकांसाठी ‘माझी रिक्षा सुरक्षित’ रिक्षा स्पर्धा

रिक्षांमधील गुन्हेगारी मोडीत काढण्यासोबतच आता प्रामाणिक रिक्षाचालकांना प्रोत्साहन देण्यासाठी लष्कर पोलिसांकडून 'माझी रिक्षा सुरक्षित' रिक्षा स्पर्धेचे आयोजन केले आहे.

    पुणे : शहरात बलात्काराच्या दोन गंभीर गुन्ह्यांसह इतरही गुन्ह्यात रिक्षाचालकांचा समावेश आढळून आल्यानंतर पुणे पोलीसांनी रिक्षांमधील गुन्हेगारी मोडीत काढण्यासोबतच आता प्रामाणिक रिक्षाचालकांना प्रोत्साहन देण्यासाठी लष्कर पोलिसांकडून ‘माझी रिक्षा सुरक्षित’ रिक्षा स्पर्धेचे आयोजन केले आहे. रिक्षाचालकांची प्रतिमा उंचविण्यासाठी ही स्पर्धा असून, स्पर्धेतील विजयी रिक्षाचालकांना रोख बक्षीस देखील दिले जाणार आहे.

    परिमंडळ दोनमधील लष्कर पोलीस ठाण्याकडून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्याबाबत परिमंडळ दोनचे उपायुक्त सागर पाटील व पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. नवरात्रौत्सवात स्पर्धा होणार आहे. प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) व पोलिसांनी दिलेल्या नियमांचे पालन करणाऱ्या रिक्षा चालकांना बक्षीसे दिली जाणार आहेत.

    पोलीसांनी माझी रिक्षा सुरक्षित, असे या स्पर्धेला नाव दिले आहे. येत्या ७ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. पहिला क्रमांक मिळविणाऱ्या रिक्षा चालकास ११ हजार रुपये रोख, द्वितीय क्रमांकास ५ हजार रोख, तृतीय क्रमांकास ३ हजार रोख बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येकी एक हजार रुपये उत्तेजनार्थ बक्षीस दिले जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या रिक्षा चालकांनी लष्कर पोलीस ठाण्यात ५ ऑक्टोबरपर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी केले आहे.