अतुल भातखळकरांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; वडगाव मावळात जोडे मारो आंदोलन

भाजप प्रवक्ते आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर राष्ट्रवादीचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.

    वडगाव मावळ : भाजप प्रवक्ते आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर राष्ट्रवादीचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. मावळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना निवेदन देण्यात आले.

    यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष सुभाषराव जाधव, विठ्ठलराव शिंदे, संतोष जांभूळकर, नारायण ठाकर, कैलास गायकवाड, पंढरीनाथ ढोरे, नगरसेवक सुनील ढोरे, महिला तालुकाध्यक्ष सुवर्णा राऊत, रुपाली दाभाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष सुनिल दाभाडे, नवनाथ चोपडे, ऍड. कृष्णा दाभोळे, साहेबराव कारके, वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र कुडे, भाऊसाहेब ढोरे, अतुल राऊत, मंगैश खैरे उपस्थित होते.

    भाजप नेते अतुल भातखळकरांनी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार सुनील शेळके यांच्याबाबत चुकीची माहिती पसरवून तसेच त्यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. तसेच समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम केल्याने त्याचा निषेध करत अतुल भातखळकर यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले.

    सुनील शेळके यांच्याबद्दल चुकीची माहिती तसेच बदनामी केल्याप्रकरणी भाजप नेते अतुल भातखळकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी केले.