विजयी दिनाचे राजकारण होता कामा नये : आनंदराज आंबेडकर

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी पेरणे येथे भेट देऊन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला असून यावेळी एक जानेवारी रोजी होणाऱ्या अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विजय रण स्तंभ परिसरात त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

  • विजय रणस्तंभाची पाहणी

  कोरेगाव भीमा : पेरणे फाटा ( ता.शिरूर) स्थानिक समितीला विजय रणस्तंभ अभिवादन उत्सव साजरा करण्याचा अनुभव अनेक वर्षाचा आहे. या अनुभवाचा उपयोग करून घेऊन प्रशासनाने पुर्वीच्या आयोजकांना विश्वासात घ्यावे. शासकीय समितीच्या अंतर्गत उपसमिती तयार करून त्यात सर्वांनाच स्थान द्यावे. कोरोनाच्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबू नये. विनाकारण नागरिकांना त्रास देऊ नये. कोरेगाव भीमा विजयी दिनाचे कोणत्याही परिस्थितीत राजकारण होता कामा नये. लोकशाहीचा आदर करावा, असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केले.

  विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी पेरणे येथे भेट देऊन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला असून यावेळी एक जानेवारी रोजी होणाऱ्या अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विजय रण स्तंभ परिसरात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय सचिव संजीव बौधनकर , विद्यार्थी सेना प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे, कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रमुख युवराज बनसोडे , पुणे जिल्हाप्रमुख दिपक जगताप, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल म्हस्के, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय देखणे, भारतीय बौद्ध महासभा पेरणे शाखाध्यक्ष सचिन चव्हाण, संजय मने, हरिश्चंद्र धावारे, विनोद पटकुरे उपस्थित होते.

  पुस्तक विक्री स्टॉलसाठी विजय स्तंभाजवळ जागा द्या

  पुस्तके विक्री करणाऱ्या लोकांना जे स्टॉल उपलब्ध करून दिली आहेत. विजय स्तंभ परिसरापासून जास्त लांब असल्याने वाचकांना स्टॉलजवळ येणं शक्य होईल असे वाटत नाही. परिणामी खरेदी विक्री होणार नाही. याचा विचार करून प्रशासनाने पुस्तके विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना स्तंभाच्या मागच्या बाजूला पुस्तक स्टॉलला परवानगी द्यावी.

  पर्यटन क्षेत्राप्रमाणे विकास करावा

  विजय रण स्तंभाचा संपूर्ण परिसर कायमस्वरूपी विद्युतीकरण झाले पाहिजे. नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात. तसेच विकास आराखड्याबाबत प्राथमिक पातळीवर चर्चा करण्यात येणार आहे. विजय रणस्तंभ परिसराचा शास्वत पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करायला हवा असे मतही आंबेडकर यांनी व्यक्त केले.