लाच प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून स्थायीच्या सदस्यांना नोटीस

पिंपरी चिंचवड महापालिकेडील २८ वेगवेगळ्या जागांमध्ये होर्डिंग उभारण्यासाठी तक्रारदाराने निविदा भरल्या होत्या. २०१९ व २०२० च्या निविदा मंजूरही झाल्या. मात्र, वर्क ऑर्डर देण्यात आली नव्हती. करारनामा सील करण्यासाठी स्थायी समिती अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे यांच्याशी संपर्क केला.

  पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीतील भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि अपक्ष गटाच्या १५ सदस्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रोजी नोटीस दिली आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेवून एसीबीच्या उपअधिक्षक सिमा मेहेंदळे यांनी सर्वांना नोटीस दिली आहे. दरम्यान, तक्रारदाराने दिलेल्या जबाबानूसार आकाशचिन्ह व परवाना विभागातील प्रलंबित होर्डिग्जच्या फाईल्स आणि व्हाईस रेकाॅर्ड संभाषणातील टक्केवारी वाटणीबाबत खुलासा करावा लागणार आहे.

  महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांनी स्वीय सहाय्यकांकडून होर्डिग्ज ठेकेदाराकडून दहा लाखाची लाच घेण्याची मागणी केली होती. त्यानूसार संबंधित ठेकेदाराने एसीबीकडे तक्रारीनूसार सापळा रचून लाच घेताना स्वीय सहाय्यकाला रंगेहाथ पडकले. यावेळी नितीन लांडगे यांच्यासह ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे ( स्वीय सहाय्यक वय ५६, रा. रामनगर सोसायटी गव्हाणेनगर भोसरी), अरविंद भीमराव कांबळे ( शिपाई, रा. भीमनगर, पिंपरी), राजेंद्र जयवंत शिंदे ( संगणक ऑपरेटर रा. जय मल्हार, थेरगाव वाकड) विजय शंभुलाल चावरिया (लिपीक, रा. धर्मराजनगर) यांना अटक केली होती.

  लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या तपासात महापालिकेच्या स्थायी समिती सभापतींचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे यांनी तक्रारदार ठेकेदाराला ‘ते सर्व सोळा जणांना द्यावे लागतात’ असे सांगितल्याचे बाब पुढे आले होती. तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांनीच पिंगळे यांना ‘३ टक्क्याऐवजी २ टक्के करा असे आदेश दिल्याचे दोघांचे संभाषण व्हॉईस रेकॉर्डरवर रेकॉर्ड झाले आहे. यामध्ये कोण-कोण सामील आहे, याचा तपास करणे गरजेचे असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले होते.

  दरम्यान, स्थायी समितीतील ते पंधरा सदस्य एसीबीच्या रडारवर होते. त्यामध्ये भाजपचे ९, राष्ट्रवादीचे ४, शिवसेना १ आणि अपक्ष आघाडीचे १ असे १५ सदस्य रडारवर होते. त्यानूसार एसीबीच्या उपअधिक्षक सिमा मेहेंदळे यांनी आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेवून सर्व स्थायी सदस्यांना नोटीस बजावली आहे. यामध्ये भाजपचे शत्रूघ्न काटे, सुवर्णा बुर्डे, अंबरनाथ कांबळे, शशिकांत कदम, संतोष कांबळे, भिमाबाई फुगे, सुरेश भोईर, रवि लांडगे तर राष्ट्रवादीचे सुलक्षणा धर, प्रविण भालेकर, पोर्णिमा सोनवणे, राजू बनसोडे, शिवसेनेच्या मिनल यादव आणि अपक्ष निता पाडाळे यांना नोटीस बजावली आहे.

  नोटीसीत म्हटले आहे की, ठेकेदाराच्या तक्रारीनूसार पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ५४४\२०२१ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ नूसार कलम ७, ७/अ, १२ भा.दं.वि. १२० ब या गुन्ह्याच्या तपासाकामी आपणाकडे चाैकशी करायची आहे. आपण २१ ते २९ सप्टेंबर २०२१ कालावधीत शासकीय सुट्टी वगळून इतर दिवशी कार्यालयीन वेळेत लाचलुचप प्रतिबंधक विभाग, पुणे कार्यालयात न चुकता हजर रहावे, असं सांगण्यात आले आहे.

  काय होतं प्रकरण..

  पिंपरी चिंचवड महापालिकेडील २८ वेगवेगळ्या जागांमध्ये होर्डिंग उभारण्यासाठी तक्रारदाराने निविदा भरल्या होत्या. २०१९ व २०२० च्या निविदा मंजूरही झाल्या. मात्र, वर्क ऑर्डर देण्यात आली नव्हती. करारनामा सील करण्यासाठी स्थायी समिती अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे यांच्याशी संपर्क केला. त्यांनी बोली रकमेच्या बीड अमाऊंटच्या ३ टक्के रक्कमेनुसार १० लाख रूपयांची मागणी केली. तडजोडीअंती ६ लाख रूपये देण्याचे ठरले. त्यातील १ लाख १८ हजार रूपयांची रक्कम पहिल्या टप्प्यात देण्याचे ठरले आणि उर्वरित रक्कम वर्क ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर देण्याचे ठरले. मात्र, १ लाख १८ हजार रूपयांची रक्कम पिंगळे यांनी स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.