आता ओबीसींचे शैक्षणिक नोकरीतील आरक्षण जाण्याचा धोका: देवेंद्र तायडे

ओबीसी आरक्षणाचा लाभ घेऊन निवडणूक लढलेल्या सर्व पक्षातील आजी - माजी नगरसेवकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे. पुढच्या पिढीचे भवितव्य या निकालामुळे धोक्यात आले आहे. आता शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षण वाचवण्यासाठी सर्वांनी एकजूट दाखवावी

    पिंपरी:सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधिल ओबीसी समाजाचे आरक्षण संपुष्टात आले आहे. हे आरक्षण कायदेशीर लढाई देऊन पुन्हा मिळवण्यासाठी आता ओबीसी समाजाने एकजूट दाखवून आंदोलन यशस्वी करावे. आगामी काळात शैक्षणिक तसेच नोकरीतील आरक्षण जाण्याचा धोका असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी केले.

    सोमवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ओबीसी संघर्ष समितीचे आनंदा कुदळे, भिडे वाडा बचाव कृती समितीचे काळूराम गायकवाड, कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, बाराबलुतेदार महासंघाचे विशाल जाधव, जय भगवान बाबा महासंघाचे प्रा. गणेश ढाकणे तसेच संतोष जोगदंड, मेहूल कुदळे, ॲड. विद्या शिंदे, राजन नायर, सुखदेव खेडकर आदी उपस्थित होते.

    यावेळी आनंदा कुदळे यांनी सांगितले की, पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात सकाळी अकरा वाजता ओबीसी समाजातील प्रतिनिधी आंदोलन करणार आहेत. माननिय सर्वोच्च न्यायालयाने एका रिट पिटीशनवर दिलेल्या निकालामुळे देशातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका व महानगरपालिकांमधील ओबीसींसाठी राखीव असलेल्या सर्व जागा रद्द झाल्या आहेत. यामुळे ओबीसी समाजाचे देशभरातील राजकारण संपुष्टात येईल. यामुळे सर्व ओबीसी समाजांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सरकारचा निषेध करण्यासाठी ओबीसी बंधू, भगिनींनी आपल्या घराबाहेर, दुकानाबाहेर, रस्त्यावर उभे राहून फलक फडकवून, दंडाला काळी फित लावून आपला निषेध नोंदवावा.

    ओबीसी आरक्षणाचा लाभ घेऊन निवडणूक लढलेल्या सर्व पक्षातील आजी – माजी नगरसेवकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे. पुढच्या पिढीचे भवितव्य या निकालामुळे धोक्यात आले आहे. आता शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षण वाचवण्यासाठी सर्वांनी एकजूट दाखवावी असे आवाहन गिरीजा कुदळे यांनी केले.

    विशाल जाधव यांनी सांगितले की, हे आंदोलन पक्ष विरहीत असून या आंदोलनात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, बारा बलुतेदार महासंघ, ओबीसी संघर्ष समिती, वंचित बहुजन आघाडी, जय भगवान महासंघ, माळी महासंघ या संस्था व सामाजिक संघटनांचे पदाधिकारीही सहभागी होणार आहेत.