ग. दि. माडगुळकर नाट्यगृहाच्या कामाला गती द्या- आमदार महेश लांडगे यांची मागणी

शहरातील कलाप्रेमींच्या दृष्टीने ग. दि. माडगुळकर नाट्यगृहाचे काम त्वरीत मार्गी लागणे अपेक्षीत आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वच विकासकामांवर परिणाम झाला आहे. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात असल्याने महापालिका प्रशासनाने नाट्यगृहाचे काम तात्काळ मार्गी लावावे.

    पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पूर्वीच्या प्राधिकरण हद्दीत उभारण्यात येत असलेल्या नियोजित ग. दि. माडगुळकर नाट्यगृहाचे(G . D. Madgulkar Natyagriha) विद्युतविषयक काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यासाठी आवश्यक निविदा कार्यवाही न केल्यामुळे नाट्यगृहाचे काम रेंगाळले आहे. याबाबतची आवश्यक कार्यवाही तात्काळ पूर्ण करून कामाला गती द्यावी अशी मागणी भाजपा आमदार तथा शहराध्यक्ष महेश लांडगे (MLA Mahesh Landage) यांनी केली आहे.

    याबाबत लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील(Pimpri-Chinchwad Municipal Commissioner Rajesh Patil) यांना लेखी निवेदन दिले आहे. प्राधिकरणातील रहिवाशांची सांस्कृतिक गरज भागवण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या या नाट्यगृहाचे काम २०१६ मध्ये सुरू करण्यात आले आहे. यामध्ये महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून मुख्य नाट्यगृह, कॉन्फरन्स हॉल, कलादालन, कॅफेटेरिया, कलावंतांसाठी १२ खोल्या अशी सुसज्ज सोय करण्यात येणार आहे. येथील नाट्यगृह आणि मिनी थिएटरचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र, विद्युत व्यवस्था, ध्वनी व्यवस्था , अॅम्फी थिएटर, रेस्टॉरंट, फ्लोअरिंग, विद्युतविषयक कामे, इंटेरिअर आदी कामे सध्या सुरू आहेत.

    दरम्यान, प्रशासनाने नाट्यगृहातील विद्युतविषयक कामांसाठी निविदा काढली आहे. मात्र, त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. विद्युतविषयक कामे सुरू झाल्यानंतर स्थापत्यविषयक कामांना गती मिळणार आहे. नाट्यगृहातील आवश्यक साउंड सिस्टीम, उद्वाहक यंत्रणा, रंगमंचावरील प्रकाश व्यवस्था, अग्निशामक यंत्रणा, फायर अलार्म सिस्टिम, वातानुकूलित यंत्रणा, परिसरातील पथदिवे सुरू करण्यासाठी उच्च दाब वीजपुरवठ्याच्या वीज मीटरसाठी सुरक्षा ठेव आणि अन्य बाबींसाठी खर्चाची तजवीज करावी लागणार आहे. शहरातील कलाप्रेमींच्या दृष्टीने ग. दि. माडगुळकर नाट्यगृहाचे काम त्वरीत मार्गी लागणे अपेक्षीत आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वच विकासकामांवर परिणाम झाला आहे. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात असल्याने महापालिका प्रशासनाने नाट्यगृहाचे काम तात्काळ मार्गी लावावे अशी मागणी करण्यात आली आहे.