पुणे जिल्हा शिक्षक समितीच्या वतीने कोविडयोद्धा सन्मान सोहळा संपन्न

    सासवड : महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती इतिहास हा गौरवास्पद असून, पुणे जिल्हा शिक्षक समितीचे काम उल्लेखनीय आहे. कोविडच्या महामारीच्या काळात राज्यभरात शिक्षकांनी खूप काम केले असून, रेशनिंग वाटप, नाकाबंदी, कोविडसेंटर, सर्वेक्षण, लसीकरणाच्या कामात त्यांनी जीवाची बाजी लावली असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे प्रदेशाध्यक्ष उदय शिंदे यांनी सासवड (ता.पुरंदर) येथील लोकनेते दादा जाधवराव सांस्कृतिक भवन येथे बोलताना व्यक्त केले.

    पुणे जिल्हा शिक्षक समितीच्या वतीने आयोजित कोरोनायोद्धा सन्मान शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष नंदकुमार होळकर होते. सामाजिक बांधिलकी जपत कोविड काळातील सेवेबरोबर शिक्षकांनी शाळांची गुणवत्ता राखल्याबद्दल होळकर यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी राज्य नेते आबा शिंपी, महादेव माळवदकर, सुनील वाघ, राजेश ढोबळे, शरद निंबाळकर, संभाजी फराटे, नफिसा आतार, नीता परदेशी, मानसिंग वाकडे, सचिन हंगरगे, विश्वनाथ कौले उपस्थित होते.

    यावेळी संदीप जगताप (भोर), बाळासाहेब गोडे (जुन्नर), नंदकुमार जगताप (बारामती), भूषण जोंजाळ (इंदापूर), दत्तात्रय दिवेकर (दौंड), सचिन सातभाई (पुरंदर), किरण राऊत (शिरूर), श्रद्धा नाडकर्णी (हवेली), किसन गवारी (मावळ), राजेंद्र शेळकंदे (आंबेगाव), देवराम भोर (खेड), अविनाश दुर्गाडे (मुळशी) यांना कोविडयोद्धा सन्मान देत गौरविण्यात आले.