रक्ताच्या थारोळ्यात आढळले तरुण; एकाचा खून तर दुसरा गंभीर, पुण्यात गेल्या तीन दिवसातील खुनाची चौथी घटना

राम पूजन शर्मा आणि त्याचे दोन मित्र वारजे माळवाडी परिसरात एकत्र राहत होते. आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास हे दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

    पुणे : वारजे माळवाडी परिसरात दोघांवर हल्ला करत एकाचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पहाटे उघडकीस आला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान शहरात गेल्या तीन दिवसातील हा चौथ्या खुनाची घटना घडली आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

    राम पूजन महिंद्र शर्मा असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. डोक्यात लोखंडी रॉडने वार करून त्याचा खून करण्यात आला. तर त्याचाच एक मित्र गंभीर जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    राम पूजन शर्मा आणि त्याचे दोन मित्र वारजे माळवाडी परिसरात एकत्र राहत होते. आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास हे दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता राम पूजन शर्मा हा मयत झाला. तर यांच्या सोबत असणारा आणखी एक तरुण बेपत्ता आहे. त्यानेच हा खून केला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वारजे माळवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.