कात्रज – कोंढवा’ रस्त्याचे अवघे २० टक्केच काम ; भूसंपादनाशिवाय दिलेली ‘वर्क ऑर्डर’ सत्ताधार्‍यांच्या अंगलट , कामाची मुदत सहा महिन्यांत संपणार

उर्वरीत जागा मालकांनी रोख मोबदला मागितल्याने उर्वरीत भूसंपादन होउ शकले नाही. त्यामुळे काही भागात टप्प्याटप्प्याने अर्थात खोदाईचे व काही मीटर कॉंक्रीटीकरणाचे कामच आतापर्यंत होउ शकले आहे. हे काम साधारण २० टक्केच आहे. सध्यातरी सर्व काम ठप्प असून वर्दळीच्या या मार्गावरील वाहतूक कोंडी आणि छोट्या मोठ्या अपघातांची मालिका अद्याप कायम आहे.

  पुणे : कुठल्याही नियोजनाशिवाय ‘कोट्यवधी’ंचा प्रकल्प उभारण्यासाठी घातलेला घाट महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या अंगलट आला आहे. जागा ताब्यात नसतानाही सुरू केलेले कात्रज – कोंढवा रस्ता रुंदीकरणाच्या कामाची मुदत संपण्यास अवघे सहा महिनेच उरले असताना जेमतेम २० टक्केच काम झाले आहे. भुसंपादनातील अडचणींमुळे तूर्तास काम ठप्प झाले असून या कामाच्या कन्सल्टंटनेही हा प्रकल्प सोडून दिल्याने सत्ताधार्‍यांची नाचक्की झाली आहे.

  कात्रज येथील राजस सोसायटी ते कोंढवा येथील खडी मशिन चौकापर्यंतच्या सुमारे पावणेचार कि.मी. लांब आणि ८४ मी. रुंद बाह्यवळण मार्गाची सुमारे १५० कोटी रुपयांची मुंबईच्या मेसर्स पटेल इंजिनिअरींग कंपनीची निविदा मंजुर करून ३१ डिसेंबर २०१८ मध्ये वर्कऑर्डर देण्यात आली. वर्क ऑर्डरनुसार ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत काम पुर्ण करणे अपेक्षित आहे. या कामाचे श्रेय हे भाजपचेच असून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकसभा निवडणुकीपुर्वी या कामाचे भुमीपूजनही थाटामाटात करण्यात आले. या कामासाठी रस्त्याच्या दुतर्फा भुसंपादन करण्याची जबाबदारी महापालिकेची होती. यासाठी महापालिकेने विशेष मोहिम राबवून ७४ टक्के भूसंपादनही केले.

  मात्र, उर्वरीत जागा मालकांनी रोख मोबदला मागितल्याने उर्वरीत भूसंपादन होउ शकले नाही. त्यामुळे काही भागात टप्प्याटप्प्याने अर्थात खोदाईचे व काही मीटर कॉंक्रीटीकरणाचे कामच आतापर्यंत होउ शकले आहे. हे काम साधारण २० टक्केच आहे. सध्यातरी सर्व काम ठप्प असून वर्दळीच्या या मार्गावरील वाहतूक कोंडी आणि छोट्या मोठ्या अपघातांची मालिका अद्याप कायम आहे. या प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मेसर्स सी.व्ही. कंद कन्सल्टंटस प्रा. लि. ने दोन महिन्यांपुर्वी या प्रकल्पातून अंग काढून घेतल्याने अडचणींमध्ये आणखीनच भर पडली आहे.

  कात्रज- कोंढवा रस्त्याच्या कामाची पूर्वपिठीका
  * देहूरोड- कात्रज बाह्यवळण मार्ग मंतरवाडी- सासवड रस्त्याने सोलापूर रस्त्याला जोडणारा मार्ग.
  * मोठ्याप्रमाणावर परिसर विकसित झाल्याने जड वाहनांसह अन्य वाहनांची वाहतूक वाढली, तुलनेने रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडी, अपघातांचे मोठे प्रमाण. आतापर्यंत ८० हून अधिकजणांचा अपघाती मृत्यू.
  * प्रकल्पाचा खर्च अधिक असल्याने पीपीपीसह अन्य मॉडेलनुसार विकसनासाठी प्रयत्न. परंतू यासाठी खर्च अवाढव्य असल्याने तसेच ठराविक ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून निविदा प्रक्रिया राबविल्याने टीकेच्या स्थानी. अखेर पाचव्यांदा महापालिकेनेच काम करण्याचा निर्णय. त्यामुळे सुमारे २५० कोटींची प्रकल्पीय रक्कम १५० कोटी रुपयांपर्यंत कमी झाली.
  * केवळ कात्रज ते कोंढवा हा पावणेचार कि.मी.चा सहा पदरी रस्ता, दोन भुयारी मार्ग, रस्त्याच्या कडेल पार्किंगची व्यवस्था, आकर्षक सजावट करण्याचे नियोजन.
  * ८० टक्क्यांहून अधिक भूसंपादन झाल्याशिवाय वर्क ऑर्डर न देण्याच्या नियमाची पायमल्ली करून ठेकेदार कंपनीला वर्क ऑर्डर देण्यात आली. भूसंपादनात अडथळे आल्याने प्रकल्पाचे काम ठप्प.
  * वर्क ऑर्डर दिल्याने जुन्या रस्त्याच्या डागडुजीचे काम अडीच वर्षांपासून बंद. परिणामी रस्त्यांवर खड्डे, साईडपट्टयांवर राडारोडा, एवढेच नव्हे केबलची कामे केल्यानंतर अद्याप रिइंन्स्टीटमेंटची कामे झालेली नाहीत.
  * शिवणे ते खराडी दरम्यानच्या रस्त्याच्या कामाप्रमाणेच रखडलेला सर्वात मोठा प्रकल्प.
  * ठेकेदाराला आतापर्यंत ३० ते ३५ कोटी रुपयांची बिले अदा करण्यात आली आहेत.
  * मुदतीनंतर काम करायचे झाल्यास महापालिकेला नवीन डी.एस.आर. दराने अधिकचे पैसे मोजावे लागणार.