जिरवाजिरवीच्या राजकारणात राष्ट्रवादीची जिरली ; नेत्यांचा अतिउत्साह आवरण्यावर पवारांना द्यावे लागणार लक्ष

विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात संघर्ष करण्याचे निर्देश पक्षाध्यक्षांकडून येतात. त्यानुसार आपल्या परीने कार्यकर्ते, मतदार लढतातही. त्यानंतर त्याच उमेदवाराला पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून सर्वतोपरी ताकद दिली जाते; परंतु शब्दाबाहेर नाही, असे म्हणणाऱ्या त्याच नेत्यांकडून जावळीच्या निवडणुकीत वरिष्ठांच्या निर्देशाचे पालन का झाले नाही, हाही महत्त्वाचा प्रश्नन उपस्थित होतो.

    सातारा : गेल्या दोन दशकापासून सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर एकसंघ पकड ठेवणारा राष्ट्रवादी पक्ष प्रचंड अडचणीत आल्याचे सातारा जिल्हा बँकेच्या निकालांनी स्पष्ट केले . भाजपला जवळ करण्याच्या नादात निष्ठावंतांच्या निष्ठेची माती करणारे राजकारण राबविले गेल्याने दस्तुरखुद्द राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी याच अस्वस्थतेतून शासकीय विश्रामगृहावर थिंक टँकची चांगलीच झाडाझडती घेतली .पक्षीय चौकट सोडलेल्या अतिमहत्वाकांक्षी वृत्तींना आवर घालण्याचा करेक्ट कार्यक्रम थोरल्या पवारांना करावा लागणार आहे . राजेमंडळीनी स्वतःला सेफ करत बॅंक तर ताब्यात ठेवलीच पण निष्ठावंतांमध्येच कळवंड लागल्याने राष्ट्रवादीच्या विरोधात राष्ट्रवादीनेच स्वतःची जिरवल्याचे स्पष्ट झाले .

    जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीतीलअडवा-जिरवाच्या राजकारणामुळे बालेकिल्ल्या तील सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. राष्ट्रवादीअंतर्गतच दोन भूमिका पक्षाला घातक ठरत असल्याची भावना हक्काचा मतदार व कार्यकर्त्यांमध्ये पसरली आहे. राष्ट्रवादीला खिळखिळे करू शकणाऱ्या अंतर्गत कुरघोड्या व कलहाची पाळेमुळे वेळीच ठेचली नाहीत, तर पक्षाला आगामी काळात याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. अवघ्या तीन आमदारांवर मर्यादित झालेल्या पक्षाला पुन्हा भक्कम उभारी द्यायची असेल, तर पक्षाध्यक्ष शरद पवार यांना पक्ष पुनर्बांधणीसाठी जिल्ह्यात जातीने लक्ष घालावे लागणार आहे.पक्षासाठी कार्यकर्त्यांनी झिजायचे, शरद पवारांकडे पाहून मतदारांनी मतदान कारायचे आणि या सर्वांच्या जिवावर मोठे झालेल्या नेत्यांनी पक्षापेक्षा स्वहिताला प्राधान्य द्यायचे, सर्व काही आपल्या व आपल्या बगलबच्च्यांच्या ताटात अशी बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यात राष्ट्रवादीची तऱ्हा झालेली आहे. अध्यक्षांचे मनसुबे काहीही असो जिल्ह्याचा ‘कंट्रोल’ आपल्याच हातात राहिला पाहिजे, असा राष्ट्रवादीअंतर्गत एक गट विधानसभा निवडणुकीपासून जिल्ह्यात कार्यरत आहे. त्यामुळे त्या निवडणुकांमध्ये पक्षाचे नुकसान झालेच; परंतु याअंतर्गत कलहाच्या राजकारणाची प्रचिती जिल्हा बॅंक निवडणुकीतही सर्वसामान्य कार्यकर्ता व मतदाराला प्रकर्षाने जाणवली आहे.वास्तविक जिल्हा बॅंकेच्या राजकारणात राष्ट्रवादीची स्वत:ची अशी एक ताकद होतीच. स्वबळावर लढलो, तरी जिल्हा बॅंक राखू, असा कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास होता. त्यातून सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही लढायची संधी मिळाली असती; परंतु पक्षाच्या अस्तित्वासाठी स्वत: कशाला संघर्षात पडायचे, ही नेत्यांची मानसिकता जिल्हा बॅंकेच्या आजच्या या निकालाला कारणीभूत ठरली आहे. सर्वसमावेशक पॅनेलचा घाट घालणाऱ्यांनी पॅनेलचे सर्व उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी १०० टक्के घ्यायलाच पाहिजे होती; परंतु आपले काम झाले, की पक्षाच्याच अन्य नेत्यांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करण्याच्या कामाला ते लागले. मुळात कोणाला उमेदवारी द्यायची, याचा निर्णय कशाच्या आधारावर घेतला गेला, असा प्रश्न प्रभाकर घार्गे व सुनील माने यांच्याबाबतीत घेतलेल्या निर्णयावर उपस्थित होतो. जिल्हा बॅंकेचे विद्यमान संचालक असताना त्यांना डावललं जाणं सर्वसामान्यांना रुचल्याचं दिसत नाही.आमदार शशिकांत शिंदे यांना खिंडीत गाठण्याची रसद राष्ट्रवादीतूनच पुरविली गेली त्याला निमित्त मात्र भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे ठरले . जावलीत आणि परळीतला शशिकांत शिंदे यांचा वावर बाबा राजेंना रुचला नाही . शिंदे यांनी पक्ष वाढीचे घेतलेले मिशन त्यांच्या अंगाशी आले . जावलीत त्या नाराज गटांशी कुठेतरी संवाद कमी पडल्याचे निकालावरून दिसले मात्र तरीही टायगर अभी जिंदा है म्हणत शिंदे साहेबांनी निकाल जवळपास फिरविलाच होता मात्र बंडखोर उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांचे नशीब जोरावर होते . शिंदे यांची राष्ट्रवादीने जिरवली तर चिठ्ठीने माण व कोरेगाव येथेदोन ठिकाणी राष्ट्रवादीची जिरविली . राष्ट्रवादीची कोरेगावमध्ये पकड असताना सुनील खत्री यांनी सरळ सरळ राष्ट्रवादीची मते फोडली . माणमध्ये स्व . सदाशिवराव पोळ यांची पुण्याई सुध्दा चिरंजीव मनोज पोळ यांना तारू शकली नाही . खटावमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय प्रतिष्ठेवर पाणी पडले . प्रभाकर घार्गे यांनी खटावमध्ये सबकुछ मीच असल्याचे दाखवले .

    विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात संघर्ष करण्याचे निर्देश पक्षाध्यक्षांकडून येतात. त्यानुसार आपल्या परीने कार्यकर्ते, मतदार लढतातही. त्यानंतर त्याच उमेदवाराला पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून सर्वतोपरी ताकद दिली जाते; परंतु शब्दाबाहेर नाही, असे म्हणणाऱ्या त्याच नेत्यांकडून जावळीच्या निवडणुकीत वरिष्ठांच्या निर्देशाचे पालन का झाले नाही, हाही महत्त्वाचा प्रश्नन उपस्थित होतो. राष्ट्रवादीचे सर्वाधिक मतदार असणाऱ्या कोरेगाव सोसायटी गटात चिठ्ठीची वेळ का आली, याचाही विचार आवश्यक आहे. यातून कार्यकर्ते व मतदारांनी काय बोध घ्यायचा?