आर्श्चयम् ! सूर्याला पडले खळे; बारामतीकरांच्या नजरा आकाशाकडे…

    सोमेश्वरनगर/तुषार धुमाळ : बारामती शहर व तालुका परिसरात मागील दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून, आकाश निरभ्र होते. दुपारी १२ ते २ वाजण्याच्या दरम्यान सूर्याभोवती पडलेले खळे पाहावयास मिळाले. अन् बारामतीकरांच्या नजरा खिळल्या आकाशाकडे…अनेकांनी त्याला आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले व सोशल मीडियावर ते फोटो शेअर केले गेले. हे खळे आकाशात बराच वेळ असल्याने याची चर्चा तालुकाभर पसरली होती. यामुळे बऱ्याच तर्कवितर्कांना उधाण आले होते.

    या मागचे खगोल कारण जाणून घेण्याकरिता कोल्हापुरातील खगोलशास्त्रज्ञ अभ्यासक डॉक्टर प्राध्यापक मिलिंद कारंजकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सूर्याभोवती पडणारे खळं हे फिजिक्समधील ऑप्टीकसचा भाग आहे. सूर्याभोवतालचा खळं किंवा रिंगण हा प्रिसममधून किरणे गेल्यानंतर जसे सप्तरंग दिसतात तसाच हा प्रकार आहे. या सूर्याभोवतीलच्या खळ्यास इंग्रजीमध्ये हॅलो (halo) असे म्हणतात. तसेच मराठीमध्ये इंद्रधनुष्याचे प्रभामंडळ असे म्हणतात.

    वादळ आल्यानंतर आकाशामध्ये जवळजवळ २० हजार फूट उंचीवर सिरस नावाचे ढग तयार होतात. या ढगांमध्ये लाखोंच्या संख्येने लहानलहान बर्फाचे क्रिस्टल्स असतात. या क्रिस्टल्समधून सूर्याची किरणे गेल्यानंतर त्या किरणांचे रिफ्लेक्शन किंवा रिफ्रॅकशन किंवा स्प्लिंटिंग होते. यामध्ये बर्फाचे असणारे तुकडे हे  प्रिझमसारखे काम करतात. पाण्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा १. ३३ आहे.

    पाणी हे द्रव स्वरूपात असते तर बर्फ हा घन पदार्थ असतो. त्यामुळे हवेतून सूर्याची किरणे जेव्हा घन पदार्थातून जातात. तेव्हा माध्यम बदलते व किरणांचे वक्रीकरण होते. यातूनच सूर्याभोवतीलचे खळं पाहावयास मिळते. या गोलाची त्रिज्या २२ अंश डिग्री इतकी असते. यामध्ये या गोलाच्या आतील बाजूस लाल रंग दिसतो तर बाहेरच्या बाजूस निळा रंग दिसतो. हे खळे फक्त सूर्याभोवतीच दिसते असे नाही तर चंद्राभोवतीही असे खळे दिसते. यामध्ये कोणतीही अंधश्रद्धा बाळगू नये.

    खाळ्यामागे खगोेलीय कारण

    “सूर्याभोवती पडणाऱ्या खाळ्यामागे खगोलीय कारण असते. मात्र, ग्रामीण भागातील शेतकरी यामागे दुष्काळ पडणार, पाणीटंचाई होणारे यासह अनेक चुकीचे अंदाज लावून मोकळे होतात असे न करता सर्वांनीच अशा घटनांमागील शास्त्रीय कारणे शोधणे गरजेचे आहे. ”

    – प्रा. डॉ. मिलिंद मनोहर कारंजकर, पदार्थ विज्ञान  व खगोल शास्त्र विभाग प्रमुख, विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर.