गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आमदार महेश लांडगेंच्या नेतृत्त्वाखाली पिंपरी-चिंचवड भाजपाचे आंदोलन

राज्याच्या सुरक्षेची जबाबदारी असलेला गृहमंत्रीच १०० कोटी रुपयांची हप्तेवसुली करण्याची आदेश आयुक्तांना देत असेल, तर ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे. अशा भ्रष्ट मंत्र्यांना पाठिशी घालणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि गृहमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा- महेश लांडगे

    पिंपरी: महाविकास आघाडी सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले आहेत. प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची हप्तेवसुली केली जात होती. अशा गृहमंत्र्याचा तात्काळ राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड भाजपाकडून निदर्शने करण्यात आली. पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वाखाली हप्तेखोरीच्या आरोपातील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करीत रविवारी शहर भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

    आमदार लांडगे म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सचिन वाझे प्रकरणी महाविकास आघाडी सरकारला विधानसभा अधिवेशनात धारेवर धरले. वाझेंवर कारवाई झाली. आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी वाझेंच्या मदतीने गृहमंत्री अनिल देशमुख महिन्याला १०० कोटी रुपये वसुली करीत होते, असा गंभीर आरोप केला आहे. राज्याच्या सुरक्षेची जबाबदारी असलेला गृहमंत्रीच १०० कोटी रुपयांची हप्तेवसुली करण्याची आदेश आयुक्तांना देत असेल, तर ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे. अशा भ्रष्ट मंत्र्यांना पाठिशी घालणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि गृहमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी करतो.
    यावेळी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, सघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, सरचिटणीस बाबू नायर, महिला मोर्चा शहराध्यक्षा उज्ज्वला गावडे, प्रदेश सदस्या शैला मोळक, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक संतोष लोंढे, योगिता नागरगोजेसहा भाजपचे अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.