पाईपलाईनचे काम सुरू; सदनिकाधारकांना दिलासा -आमदार महेश लांडगे यांची यशस्वी मध्यस्थ

    पिंपरी: अनियमित आणि कमी दाबणे पाणीपुरवठा, टँकरसाठी मोजावा लागणार लाखो रुपयांचा भुर्दंड, आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे मोशी येथील ‘साई हिरा क्लासिक सोसायटी’तील रहिवासी हतबल झाले होते. दरम्यान भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्याकडे सोसायटीधरकांनी गाऱ्हाणे मांडले असता त्यांनी प्रश्न समजून घेत तात्काळ पाठपुरावा केला. त्यानुसार नुकतीच सोसायटीधारक आणि पालिका प्रशासनाची बैठक झाली. त्यानंतर परिसरात पाईपलाईनचे काम सुरू झाले असून, सोसायटीधारकांचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे.

    मोशीतील प्रभाग क्रमांक तीन येथील शिवाजीवाडी परिसरात ‘साई हिरा क्लासिक सोसायटी’ आहे. सोसायटी धारकांना तीन वर्षांपूर्वी सदनिकांचा ताबा मिळाला. सोसायटीमध्ये ६६ सदनिका असून सर्व सदनिकांमध्ये रहिवासी आहेत. दरम्यान ताबा मिळाल्यापासूनच सोसायटीमध्ये कमी दाबाने तसेच अनियमित पाणीपुरवठा सुरू आहे. यामुळे सोसायटीला दररोज पाच ते सहा टॅंकर मागावे लागत असून त्यामुळे वर्षाला सात ते आठ लाख रुपयांचा भुर्दंड बसत आहे. हा भुर्दंड न परवडणारा असल्याने सोसायटी धारक अक्षरशः हतबल झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी विविध ठिकाणी पाठपुरावा केला मात्र त्यांच्या प्रत्येक निवेदन आणि मागणीला पालिका प्रशासनाकडून केराची टोपली दाखवण्यात आली. यामुळे सोसायटी धारकांची ‘ना दाद ना फिर्याद’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याने ते आंदोलनाच्या तयारीत होते.

    तत्पूर्वी, त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे धाव घेतली. आमदार लांडगे यांनी समस्या समजून घेत त्याबाबत पाठपुरावा सुरू केला. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार नुकतीच सोसायटी धारकांची पाणी पुरवठा अधिकारी आणि महेश लांडगे यांचे सहाय्यक शिवाजी घाडगे, सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीमध्ये पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी १० दिवसात हा प्रश्न पूर्णपणे सुटेल, असे आश्वासन दिले. त्यानुसार सोसायटी परिसरात तात्काळ पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे पुढील काही दिवसातच सोसायटीधारकांचा प्रश्न सुटनाच्या मार्गावर आहे. महेश लांडगे यांनी तात्काळ मध्यस्थी करून हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे सोसायटी धारकांनी त्यांचे आभार मानले आहेत.

    पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल : चेअरमन गोरखनाथ जगदाळे

    गेल्या तीन वर्षांपासून याबाबत पाठपुरावा करत आहोत. मात्र सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने पालिकेसमोर उपोषण आणि आंदोलनाच्या तयारीत होतो. दरम्यान, आमदार लांडगे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. प्रश्न ऐकून घेतल्यानंतर त्यांनी तात्काळ याबाबत सूचना दिल्या. त्यानूसार बैठकीतही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सध्या पाईलाईनचे काम सुरू असून ती योग्य प्रकारे कार्यान्वित होईल तसेच हा प्रश्न कायमचा सुटेल अशी अपेक्षा आहे, असे साई हिरा क्लासिक सोसायटीचे चेअरमन गोरखनाथ जगदाळे यांनी सांगितले.