बारामतीत निरा डावा कालव्यावरील तळीरामांवर पोलिसांची कारवाई

बारामती शहरातील नीरा डावा कालव्याच्या भराव्यावर बसून मद्यप्राशन करणाऱ्या सहा तळीरामांवर पोलीसांनी कारवाई केली. सध्या निरा डावा कालव्याचे सुशोभीकरण करून बारामतीच्या सौंदर्यामध्ये भर घालण्याचे काम वेगाने सुरू आहे.

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बारामती शहरातील नीरा डावा कालव्याच्या भराव्यावर बसून मद्यप्राशन करणाऱ्या सहा तळीरामांवर पोलीसांनी कारवाई केली. सध्या निरा डावा कालव्याचे सुशोभीकरण करून बारामतीच्या सौंदर्यामध्ये भर घालण्याचे काम वेगाने सुरू आहे.

    कालव्याला तीन हत्ती चौक ते माळावरची देवीपर्यंत विद्युतीकरण करण्यात आले आहे. परंतु तीन हत्ती चौक ते पाणी शुद्धीकरण केंद्र सातव चौकापर्यंत विद्युतीकरण केलेले नाही. अंधाराचा व झाडीचा फायदा घेऊन सायंकाळी सातनंतर अनेक लोक वाईन शॉप, दारू दुकानातून पार्सल आणून सदर भागामध्ये दारू पित असतात. याबाबतच्या तक्रारी पोलिस स्टेशनला प्राप्त होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस हवालदार प्रकाश मोघे, पोलीस हवालदार यशवंत पवार यांनी अचानकपणे त्या ठिकाणी रात्री आठच्या दरम्यान जाऊन कारवाई केली असता, शहारातील सहा जण कालव्याच्या भराव्यावर ख्रिश्चन कॉलनी बारामती याठिकाणी बिस्लेरी बॉटल व पार्सल आणलेली दारू पीत असलेले निदर्शनास आले.

    त्यातील काहीजण पिणाऱ्याच्या बाजूला उगाचच बसले होते. त्यांना योग्य ती समज दिली व त्यांच्यावर खटला भरण्यात आला. अधूनमधून शहरामधील असे निर्जन हॉटस्पॉट ओळखून या भागात कारवाई करण्यात येणार आहेत. स्थानिक लोकांना असे कोणी निदर्शनास आल्यास तात्काळ कळवावे, पोलीस विभागातर्फे त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल, असे पोलिस निरिक्षक महाडिक यांनी सांगितले.