पोलिस पतीचे इतर महिलांसोबत ‘अफेअर’; निराश पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न

प्रेम विवाहानंतरही (Love Marriage) पोलिस पतीचे बाहेर दोन ते तीन महिलांशी अनैतिक संबंध ठेवत पत्नीला वाऱ्यावर सोडणाऱ्या पत्नीने नैराश्यातून औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Attempt to Suicide) केला आहे.

    पुणे : प्रेम विवाहानंतरही (Love Marriage) पोलिस पतीचे बाहेर दोन ते तीन महिलांशी अनैतिक संबंध ठेवत पत्नीला वाऱ्यावर सोडणाऱ्या पत्नीने नैराश्यातून औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Attempt to Suicide) केला आहे. खडक परिसरात ही घटना घडली आहे. स्वारगेट पोलिस वसाहत परिसरात ही घटना घडली. पोलिस पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    याप्रकरणी ४२ वर्षीय पोलिस पती, सासू व ननंद अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३० वर्षीय महिलेने खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पुणे शहर पोलिस दलात कार्यरत आहे. मुख्यलयात नेमणूक आहे. २००८  पासून तक्रारदार व त्याचे प्रेमसंबंध होते. विवाहापूर्वी त्याने तक्रारदार यांच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. २००९ मध्ये दोघांचा विवाह झाला. विवाहानंतर तक्रारदार यांना पतीचे बाहेर दोन ते तीन महिलासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. याबाबत त्यांनी जाब विचारला. त्यावेळी पतीने त्यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तर स्वारगेट येथील पोलिस वसाहतीत राहत असलेले घर सोडत संसार उपयोगी सर्व साहित्य आणि दोन मुली व लहान मुलाला घेऊन निघून गेला. तो दुसरीकडे राहत होता.

    तक्रारदार यांनी वारंवार फोन केले. परंतु, त्याने एकही फोन उचलला नाही. त्यातून तक्रारदार या मानसिक तणावाखाली होत्या. यातूनच त्यांनी मंगळवारी फरशी साफ करण्याचे फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार खडक पोलीसांना समजताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यावेळी तक्रारदार यांनी त्यांना पतीबाबत जबाब दिला. त्यानुसार पोलीसांनी त्याच्यासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, तो २० सप्टेंबरपासून कर्तव्यावर नसल्याचे सांगण्यात आले आहे. अधिक तपास खडक पोलिस करत आहेत.