पोलिसांनी छापा मारून चिखली, हिंजवडी, भोसरी, चिंचवडमधून १ लाख ११ हजार रुपये किमतीचा गांजा केला जप्त

आळंदी, भोसरी आणि निगडी परिसरात पिंपरी - चिंचवड पोलिसांनी चार ठिकाणी छापे मारले. यामध्ये १ लाख ११ हजार रुपये किमतीचा दोन किलोपेक्षा अधिक गांजा पोलिसांनी जप्त केला.

  पिंपरी: पिंपरी – चिंचवड शहरात पाच ठिकाणी छापे मारून सुमारे अडीच किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई चिखली, भोसरी, चिंचवड येथे प्रत्येकी एक तर हिंजवडी परिसरात दोन ठिकाणी करण्यात आली.

  पिंपरी – चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने चिखली मधील पूर्णानगर येथे कारवाई करत पाच हजार ८०० रुपये किमतीचा २३२ ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी समीर अमरसिंग बुडा (वय ३८, रा. चिखली) याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी विरोधी पथकाने पीडब्ल्यूडी कॉलनी, दापोडी येथे कारवाई करून रोहन उत्तम कांबळे (वय १९, रा. पिलाजी काटे चाळ, दापोडी) याला अटक केली. त्याच्याकडून २४ हजार ८०० रुपये किमतीचा ८६५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  चिंचवड पोलिसांनी काकडे पार्क, गणेश विसर्जन घाटाजवळ सापळा लावून दोघांना अटक केली. वेदांत सतिष शेलार (वय २०), शुभम विजय विटोळे (वय २१, दोघे रा. केशवनगर, चिंचवडगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी ४०० रुपये किमतीचा ३० ग्रॅम गांजा, ५५० रुपये रोख रक्कम आणि ५० हजार रुपयांची एक दुचाकी असा एकूण ५० हजार ९५० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

  हिंजवडी परिसरात दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्यातील पहिली कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबई – बेंगलोर महामार्गावर केली. यामध्ये हरून बाबू खान (वय ३२, रा. बावधन. मूळ रा. राजस्थान) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ५३४ ग्रॅम वजनाचा गांजा, मोपेड दुचाकी, रोख रक्कम असा एकूण ५८ हजार ६५० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. हिंजवडी मधील दुसरी कारवाई गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी ननवरेवस्ती येथे केली.या कारवाईमध्ये पोलिसांनी एक दुचाकी, ८२७ ग्रॅम गांजा असा ७० हजार ६७५ रुपयांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणात पोलिसांनी शिवशंकर अंबिकाप्रसाद यादव (वय १८), रामरक्षा धर्मराज पासवान (वय ३६, दोघे रा. ननवरेवस्ती, सुसगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चिखली, भोसरी, चिंचवड आणि हिंजवडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत केलेल्या पाच कारवायांमध्ये पोलिसांनी दोन लाख १० हजार ८७५ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. तसेच दोन किलो ४८८ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

  चार छाप्यात दोन किलो गांजा जप्त

  आळंदी, भोसरी आणि निगडी परिसरात पिंपरी – चिंचवड पोलिसांनी चार ठिकाणी छापे मारले. यामध्ये १ लाख ११ हजार रुपये किमतीचा दोन किलोपेक्षा अधिक गांजा पोलिसांनी जप्त केला. आळंदी पोलिसांनी खेड तालुक्यातील गोलेगाव येथे छापा मारून एकाला जेरबंद केले. दिगंबर रघुनाथ चौधरी (वय ६२) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आरोपीकडून ४८ हजार रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. पिंपरी – चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी भोसरी येथील मुस्लीम शाही कब्रस्तान गेट समोर सापळा रचून राजेभाऊ शेषराव खंडागळे (वय ५२, रा. भोसरी ब्रिज खाली) याला अटक केली. त्याच्याकडून २१ हजार ८०० रुपये किमतीचा ८८२ ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांनी जप्त केला.

  विठ्ठलवाडी, आकुर्डी येथे निगडी पोलिसांनी कारवाई करून एकास अटक केली. निलेश नंदेश्वर चव्हाण (वय ३५, रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने बेकायदेशीररित्या १ किलो २९८ ग्रॅम वजनाचा ३५ हजार ७५० रुपये किमतीचा गांजा जवळ बाळगला होता. पोलिसांनी हा गांजा जप्त केला. निगडी परिसरात आणखी एका कारवाईत ५ हजार ५५० रुपयांचा २२२ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. अहमद रजा वाशीउज्जमा खान (वय ३४, रा. निघोजे, ता. खेड) याला पोलिसांनी अटक केली.