अपघाताचा केला बनाव अन् चोरून नेला टेम्पो; पोलिसांनी केली कारवाई

  इंदापूर : अपघाताचा बनाव करून चोरून नेलेला टाटा कंटेनर व त्यामधील ११ लाख रूपयांचे लोणचे मसाल्याचे एकुण २०० बॉक्स असा एकूण पंधरा लाखांचा मुद्देमाल केवळ सात तासात ताब्यात घेत इंदापूर पोलीसांनी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. यातील दोन आरोपी फरार झाले.

  या संदर्भात चंद्रकांत तुळशीराम कांबळे (वय ६० वर्षे रा.मु.पो. मिरजापुर पो.सस्तापुर ता. बसवकल्याण जि.बिदर,कर्नाटक) या कंटेनर चालकाने फिर्याद नोंदवली आहे.

  सविस्तर हकीकत अशी की, १४ सप्टेंबरला फिर्यादी चंद्रकांत कांबळे हा त्याच्या ताब्यातील टाटा  कंपनीच्या कंटेनर (क्र.एम एच ०४ एम एच ०४ इ ९०५४) मध्ये विजयवाडा येथून लोणचे मसाल्याचे अकरा लाख रूपयांचे एकुण २०० बॉक्स घेवुन बसवकल्याण येथून त्याचा भाचा प्रशांत त्याचा मित्र श्रीनिवास चांदे व इतर एकजणास घेवून १६ रोजी बसवकल्याण येथून मुंबईतील न्हावाशेवा बंदर येथे निघाला होता.

  उजनी धरणावरील पूल ओलांडून पुढे गेल्यानंतर कांबळे यांनी श्रीनिवास चांदे यास कंटेनर चालवण्यास दिला. ते पाठीमागे झोपले. सरडेवाडी टोलनाक्याजवळ परत एकजण टेम्पोजवळ येवुन तु माझे गाडीस कट का मारला असे म्हणून गाडीचे केबीनमध्ये चढून बसला.

  काही वेळाने चंद्रकांत यास जाग आल्यानंतर त्यांनी हा चौथा माणूस कोण आहे,असे श्रीनिवासला विचारले असता, त्यांचे गाडीस कट मारल्याच्या कारणा वरून तो गाडीत बसल्याचे श्रीनिवासने सांगितले.

  कंटेनर भिगवण परिसरातील बिल्ट ग्राफिक्स कंपनीजवळ आल्यानंतर श्रीनिवास याने तो थांबवला. कांबळे यांना खाली उतरवुन मागील दरवाजा चेक करण्यास लावला. ते दरवाजा चेक करण्यास गेले असता, श्रीनिवास व भाचा प्रशांत व सोबतचे दोघे अशा चौघांनी भरधाव वेगाने टेम्पो पळवून नेला.

  या संदर्भात घटनेबाबत कांबळे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात १७ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास येवून श्रीनिवास व त्याचे इतर तीन मित्रांविरूध्द तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला.

  घटनेचे गांभीर्य ध्यानात घेवून इंदापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांनी तात्काळ आपल्या सहका-यांची तीन पथके तयार करुन तपासासाठी पाठवली. सरडेवाडी टोलनाका ते पाटस टोलनाका दरम्यानचे सर्व टोलनाके, हॉटेल, पेट्रोलपंप, ढाबे येथिल सी.सी.टी.व्ही फुटेज संशयित वाहने व इसम असे ५ ते ६ तास सलगपणे सखोल तपास करुन, गोपनीय बातमीच्या आधारे यातील टेम्पो चालक चंद्रकांत कांबळे याचा भाचा श्रीनिवास व त्याचे मित्र यांच्यावरील संशय बळकट झाल्यानंतर पोलिसांनी पुणे सोलापूर महामार्गावरील रावणगाव (ता.दौड जि.पुणे) येथून सात तासात चोरीस गेलेला टेम्पो व मुद्देमाल एकुण पंधरा लाख रूपये किंमतीचा गुन्हयातील मुद्देमाल जप्त केला.