वेळु येथे १२ लाखांची वीजचोरी; सहा जणांवर गुन्हा दाखल

भोर तालुक्यातील वेळु येथील बालाजी इंजिनिरींग वर्क येथील वीज मीटरमध्ये फेरफार करुन सहा जणांनी तब्बल 168 महिने 94221 युनिटची चोरी करत वीज वितरण कंपनीचे 12 लाख 9 हजार 160 रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात विद्युत कायदा कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    खेडशिवापूर : भोर तालुक्यातील वेळु येथील बालाजी इंजिनिरींग वर्क येथील वीज मीटरमध्ये फेरफार करुन सहा जणांनी तब्बल 168 महिने 94221 युनिटची चोरी करत वीज वितरण कंपनीचे 12 लाख 9 हजार 160 रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात विद्युत कायदा कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता गोपाल श्रीराम पाटील यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार राजगड पोलिस ठाण्यात वीजग्राहक भाऊसाहेब वाडकर, बालाजी इंजिनिअरिंग वर्कचे देविदास विबिषण गवारे, अजित काशिनाथ बाबर, राहुल गदादे, निलेश कुंडलिक जाधव, गणेश कोंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अभियंता गोपाल पाटील यांच्या भरारी पथकाने विजचोरी शोधण्यासाठी बालाजी इंजिनिअरिंग वर्कला भेट दिली असता मीटरमधील करंट व टंगटोस्टरमधील करंट यांच्यामध्ये तफावत आढळल्याने तेथील वीज मीटर काढून सील करुन वीजमीटर चाचणी विभागात तपासणीसाठी पाठवण्यात आले. तेथे अजित बाबर, निलेश जाधव यांच्यासमक्ष मीटरची तपासणी केली असता सदर वीज मिटर उणे 65.933 टक्के इतक्या कमी प्रमाणात वीज नोंदणी करत असल्याचे दिसले. यासाठी वीज मीटर खोलून पाहणी केली असता सीटी ब्लाँकचे कनेक्शन पीसीबीवरुन कट असल्याचे निदर्शनास आले.

    या केलेल्या फेरफारामुळे मीटरवर विजेच्या वापराची योग्य नोंद होऊ शकत नव्हती. ही विजचोरी असल्याचे स्पष्ट होत होते. मागील 168 महिने हा प्रकार चालु होता. त्यामध्ये 94 हजार 221 युनिटची चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे महावितरण कंपनीचे 12 लाख 91 हजार 160 रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असल्याने वरील सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याप्रकरणी पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ पुढील तपास करत आहेत.