म्युकरमायकोसिसवरील ‘अम्फोटेरिसिन बी’ इंजेक्शन देण्याचे आश्वासन; ६० हजारांची फसवणूक

    शिक्रापूर : शिरुर तालुक्यातील पाबळ येथील एका व्यक्तीला म्युकरमायकोसिस या आजारावर लागणाऱ्या इंजेक्शनची आवश्यकता होती. त्यासाठी त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून एकाला अम्फोटेरिसिन बी इंजेक्शन देण्याचे खोटे आश्वासन दिले. त्यासाठी त्याने त्याच्याकडून तब्बल ६० हजार रुपये घेत फसवणूक केली. या प्रकरणी पांचाळ नावाच्या एका व्यक्तीवर शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

    पाबळ येथील एकाला म्युकरमायकोसिस या आजाराची बाधा झाली. यावर उपचारासाठी अम्फोटेरिसिन बी या इंजेक्शनची गरज असल्याचे समजले. डॉक्टरांनीही हे इंजेक्शन घेऊन येण्यास सांगितले होते. त्यामुळे या व्यक्तीच्या नातेवाईकांनी या इंजेक्शनबाबत सोशल मीडियावर माहिती घेतली. त्यानंतर नगर येथील एका ठिकाणी पांचाळ या व्यक्तीकडे अम्फोटेरिसिन बी हे इंजेक्शन उपलब्ध असल्याचे त्यांना समजले. त्यामुळे त्यांनी या व्यक्तीच्या मोबाईलवर संपर्क करुन चर्चा केली. यावेळी चार हजार रुपयेप्रमाणे ३० अम्फोटेरिसिन बी इंजेक्शन लागणार असल्याने त्यांना ५० टक्के रक्कम घ्यायची ठरले. त्यामुळे आजारी रुग्णाच्या नातेवाईकांनी त्या व्यक्तीला त्याने दिलेल्या बँक खात्यावर ६० हजार रुपये पाठवले. त्यांनतर दोन दिवस पांचाळ याने इंजेक्शन दिले नाही. तसेच फोनही उचलला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांच्या लक्षात आले.

    दरम्यान, त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी पांचाळ (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) या फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल केले असून, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंके व पोलीस नाईक प्रताप कांबळे हे करत आहे.