पिंपरी-चिंचवड महापालिका
पिंपरी-चिंचवड महापालिका

पिंपरी-चिंचवड महापालिका सभेत तीन अधिका-यांना सहायक आयुक्त पदावर पदोन्नती देण्याचा ठराव नुकताच मंजूर करण्यात आला. मात्र, या ठरावाची अर्धवट अंमलबजावणी करण्यात आल्याने आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कार्यपध्दतीचे आश्चर्य केले जात आहे. या ठरावातील सहायक आयुक्त (सामुहिक विकास) या अभिनामाचे एक पद मंजूर असताना त्याला बगल देऊन आयुक्तांनी इतर तीन अधिका-यांना पदोन्नती दिली आहे. आयुक्तांच्या अशा दुजाभावामुळे प्रामाणिक अधिका-यावर अन्याय झाल्याचे स्पष्ट होत आहे.

  • सहायक आयुक्तांना पदोन्नती देण्याच्या ठरावाची अर्धवट अंमलबजावणी

पिंपरी (Pimpari). पिंपरी-चिंचवड महापालिका सभेत तीन अधिका-यांना सहायक आयुक्त पदावर पदोन्नती देण्याचा ठराव नुकताच मंजूर करण्यात आला. मात्र, या ठरावाची अर्धवट अंमलबजावणी करण्यात आल्याने आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कार्यपध्दतीचे आश्चर्य केले जात आहे. या ठरावातील सहायक आयुक्त (सामुहिक विकास) या अभिनामाचे एक पद मंजूर असताना त्याला बगल देऊन आयुक्तांनी इतर तीन अधिका-यांना पदोन्नती दिली आहे. आयुक्तांच्या अशा दुजाभावामुळे प्रामाणिक अधिका-यावर अन्याय झाल्याचे स्पष्ट होत आहे.

महापालिका सभा ठराव क्रमांक 913, दिनांक 29/08/2016 व ठराव क्रमांक 396, दिनांक 06/06/2019 अन्वये अण्णा बोदडे, श्रीनिवास दांगट, राजेश आगळे यांना सहायक आयुक्त पदावर पदोन्नती देण्यात आली. नुकतेच आयुक्त हर्डीकर यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. मात्र, या ठरावात पालिकेच्या आस्थापनेवर शासन निर्णय क्र. पी.सी.सी. 3089/644/सी.आर. 97/नवि 22 दिनांक 1 डिसेंबर 1989 अन्वये सहायक आयुक्त (सामुहिक विकास) अशा अभिनामाचे 1 पद मंजूर आहे. महापालिका स्थरावर शहरातील नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांची अंमलबजावणी पारदर्शक पध्दतीने होण्यासाठी या पदाची निर्मिती करण्यात आली. या पदावर पदोन्नतीने नेमणूक करण्याकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता महापालिका सभा ठराव क्रमांक 721 दि. 21/08/2009 अन्वये निश्चित करण्यात आली आहे.

तसेच, या पदाचा पदोन्नती सोपान निश्चित करण्यात आला आहे. तो समाजविकास अधिकारी वर्ग 2 असा आहे. या पदावरील अधिका-याची सेवाज्येष्ठता विचारात घेऊन तसेच शैक्षणिक पात्रता व अनुभव धारण करणा-या उमेदवारास सहायक आयुक्त (सामुहीक विकास) या पदावर पदोन्नतीने नेमणूक करण्यास मान्यता दिलेली आहे. नागरवस्ती विकास योजना विभागात समाज विकास अधिकारी वर्ग 2 या पदावर कार्यरत असणारे संभाजी ऐवले हे समाजविकास अधिकारी (सामुहीक विकास) या पदाची सर्व अर्हता पूर्ण करीत आहेत. त्यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी, सेवाज्येष्ठता, गोपनिय अहवाल व आरक्षण इत्यादी सेवा विषयक तपशील विचारात घ्यावा. शासन निर्णय 5/10/2015 मधील दरतुदीनुसार अनुभव कालावधी शिथील करून पदोन्नतीपूर्व पदावरील 90 टक्के नियमित सेवा ग्राह्य धरून वेतनश्रेणी रक्कम 15600-39100 ग्रेड पे 6600 सहायक आयुक्त पदावर संभाजी ऐवले यांना पदोन्नती देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

रीतसर ठराव मंजूर असताना आयुक्त हर्डीकर यांनी या ठरावातील 1 पद वगळून केवळ तीन अधिका-यांच्या पदोन्नतीचा आदेश काढला आहे. समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांना जाणिवपूर्वक डावलण्यात आले आहे. त्यांना डावलण्याचे नेमके कारण काय ?, हे अद्याप अस्पष्ट आहे. पालिका प्रशासनाला केवळ लांगूलचालन आणि पुढेमागे करणा-या अधिका-यांची गरज असल्याचे यातून सिध्द होत आहे. आयुक्तांनी आजपर्यंतच्या कामाचा आढावा घेऊन त्यामध्ये त्रुटी असतील तर तसे स्पष्ट करावे. त्या त्रुटींमुळे अधिकारी संभाजी ऐवले हे पदोन्नतीस पात्र नसल्याचे जाहीरपणे सांगावे, अशी भावुक मागणी दिव्यांगांचे प्रतिनिधीत्व करणा-या संघटनांच्या प्रतिनिधींनी केली आहे.