तातडीने रिट याचिका दाखल करा; इम्पिरिकल डाटा केंद्राने राज्य सरकारला द्यावा भाजप नेत्याच्या उपस्थितीत महत्वाचे ठराव मंजूर!

केंद्र, राज्य सरकारने जातनिहाय जनगणना करावी आणि पदोन्नती आरक्षण रद्द करु नये असा देखील ठराव यावेळी करण्यात आला.  या शिवाय इतर मागासवर्ग संस्थांना भरघोस निधी मिळावा. संत गाडगेबाबा यांच्या नावे आर्थिक विकास महामंडळ सुरू करावे, विधानसभा आणि लोकसभेसाठी २७ टक्के  आरक्षण द्यावे, कुंभार समाजातील संस्थेसाठी निधी द्यावा इत्यादी ठराव मंजूर करण्यात आले.

  लोणावळा: ओबीसी आरक्षणासाठी लोणावळ्यात सुरु असलेल्या ओबीसी चिंतन मंथन शिबिराच्या दुसऱ्या आणि अखेरच्या दिवशी भाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत इम्पिरिकल डाटा केंद्र सरकारने राज्य सरकारला द्यावा असा महत्वाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी हे आरक्षण पुर्नस्थापित करावे. आरक्षण पुन्हा मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुका घेऊ नयेत आणि राज्य सरकारने तातडीने रिट याचिका दाखल करून केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डाटा मिळवावा अश्या महत्वाच्या ठरावांना मंजूरी दिली आहे.

  रिट याचिका दाखल करणार
  महाविकास आघाडीचे मंत्री सुनील केदार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या शिबिराला हजेरी लावली. दरम्यान, इम्पिरिअल डाटा मिळवण्यासाठी राज्य सरकार उद्याच सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करणार असल्याची माहिती मदत पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या शिबिरात दिली आहे.

  पदोन्नती आरक्षण रद्द करु नये
  याशिवाय या चिंतन शिबीरात मराठा आरक्षणास विरोध नाही, मात्र इतर मागावर्गामधून आरक्षण देऊ नये याबाबत एकमत असल्याचा ठराव घेण्यात आला. केंद्र, राज्य सरकारने जातनिहाय जनगणना करावी आणि पदोन्नती आरक्षण रद्द करु नये असा देखील ठराव यावेळी करण्यात आला.  या शिवाय इतर मागासवर्ग संस्थांना भरघोस निधी मिळावा. संत गाडगेबाबा यांच्या नावे आर्थिक विकास महामंडळ सुरू करावे, विधानसभा आणि लोकसभेसाठी २७ टक्के  आरक्षण द्यावे, कुंभार समाजातील संस्थेसाठी निधी द्यावा इत्यादी ठराव मंजूर करण्यात आले.

  वेळ पडली तर पंतप्रधानांनाही भेटू
  भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शिबिरात आम्ही राजकीय विचार बाजूला ठेऊन आलो आहोत असे सांगत वंचितांच्या बाजूने पंतप्रधानांनी उभे राहावे, वेळ पडली तर पंतप्रधानांनाही भेटू अशी घोषणा केली. पंकजा मुंडे म्हणाल्या की, आजची बैठक ही निर्णय आणि निश्चयाची आहे, आगामी पाच महिने निवडणुका पुढे ढकलावा हा निर्णय घ्यावा, ओबीसींशिवाय निवडणुका होणार नाहीत हा निश्चिय करा असे आवाहन त्यानी केले.