तृतीयपंथीयांना ओळखपत्र देण्यात राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर !

ओळखपत्रा पुरतेच मर्यादित न राहता तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना रोजगार संधी व शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा देता येईल यावरही प्रामुख्याने विचार करून त्यानुसार शासनाच्या वतीने सर्वोतोपरी मदत केली जाईल

    पुणे: तृतीय पंथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम २०१९ अंतर्गत जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना (Transgender)  त्यांचे ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्याची तरतुद आहे. त्याअंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय तृतीयपंथीय पोर्टलवर ऑनलाइन रित्या प्राप्त असलेल्या २२ अर्जांपैकी १२ तृतीयपंथीयांना जिल्हा प्रशासन व सहायक आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्या प्रयत्नातुन  ओळखपत्र देण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे ओळख पत्र व ओळख प्रमाणपत्र जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले. राज्यात प्रथमच देण्यात पुणे जिल्हयाने आघाडी घेतली आहे.
    जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमावेळी सहाय्यक आयुक्त संगीता डावखर, समाज कल्याण निरीक्षक नेत्राली येवले, बिंदू क्वीर राइट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष बिंदुमाधव खिरे तसेच तृतीयपंथीय उपस्थित होते.
    जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, ओळखपत्रा पुरतेच मर्यादित न राहता तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना रोजगार संधी व शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा देता येईल यावरही प्रामुख्याने विचार करून त्यानुसार शासनाच्या वतीने सर्वोतोपरी मदत केली जाईल तसेच तृतीयपंथीयांनी ओळखपत्रासाठी ऑनलाइन पदधतीने जास्तीत जास्त अर्ज करावेत असे आवाहनही त्यांनी केले.
    समाज कल्याण विभागाच्या श्रीमती संगीता डावखर म्हणाल्या, तृतीयपंथीयांना देण्यात आलेले ओळखपत्र व ओळख प्रमाणपत्रे व त्याअनुषगाने करण्यात आलेल्या कार्यवाहीत पुणे जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली आहे. येणा-या काळात जास्तीत जास्त तृतीयपंथीयांना ओळखपत्र व ओळख प्रमाणपत्रे देण्यात येतील. असेही त्यांनी सांगितले.